अवजड वाहनांच्या रहदारीमुळे रस्त्यांची वरचेवर दुर्दशा
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र संगोबा परिसरातील वाघाची वाडी, बोरगाव, पाडळी आदी रस्त्यांच्या कामाची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ही कामे आठ दिवसांत सुरू न झाल्यास बोरगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला आहे.

दिवंगत पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये प्रधानमंत्री सडक योजने मधून संगोबा ते वाघाची वाडी हा रस्ता झाला होता. तसेच बोरगाव-घारगाव-पाडळी हा ही रस्ता त्याच दरम्यान झाला होता. मात्र परंडा तालुक्यातील काटेवाडी येथे असलेल्या खडी क्रशरमुळे या रस्त्यांवरून पाच ते सहा ब्रास खडी असलेल्या टिपरची वाहतूक सुरू असते. त्यामुळे हे संपूर्ण रस्ता उखडले आहेत. तसेच गेल्या कित्येक वर्षात साधी डागडुजीही झाली नसल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच श्री क्षेत्र संगोबा येथील आदिनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त दोन दिवस भरणाऱ्या यात्रेसह विविध सणवार आणि प्रत्येक एकादशी निमित्त भाविकांची गर्दी होत असते. याशिवाय या परिसरातून शालेय शिक्षणासाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध ग्रामस्थांची गैरसोय होते. रस्त्याच्या धुळीने ग्रामस्थांना श्वसनाचे आजारही होऊ लागले आहेत.

त्यामुळे येत्या आठ दिवसांमध्ये या रस्त्याचे काम चालू न केल्यास बोरगाव, वाघाची वाडी, दिलमेश्वर, पाचवड, काटेवाडी, तांदुळवाडी, घारगाव, पाडळी, कोकरवाडी येथील ग्रामस्थ मोठे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

.

.

