करमाळ्यात भाजपा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे विलासराव घुमरे यांच्या हस्ते उद्घाटन
करमाळा, विशाल परदेशी – करमाळा नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचा चंग बांधून स्थानिक भाजपा पदाधिकारी एकवटले आहेत. भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपाच्या सर्व उमेदवारांचा नेटाने प्रचार करत असतानाच शहरातील पुणे रोडच्या सलगर चहाच्या बाजूला भाजपा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ मार्गदर्शक विलासराव घुमरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

यावेळी बोलताना भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी सांगितले की, करमाळा शहर बदलाची वाट पाहत असताना भाजपाच्या वतीने करमाळा शहराचा चेहरा मोहरा बदलू इच्छिणारे कर्तुत्ववान आणि स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी देण्यात आलेले आहेत. शहरातील अनेक अडचणी सत्ता बदलाची वाट पाहत असून नव्या करमाळ्याची ब्ल्यू प्रिंट घेऊन भाजपाचे २१ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून निधी मिळविण्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्षमपणे प्रचार यंत्रणा राबवून सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन बागल यांनी शेवटी केले.

यावेळी बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, भाजप नेते कन्हैयालाल देवी, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, माजी नगरसेवक रामभाऊ घोलप, डॉ. अविनाश घोलप, प्रा. मिलिंद फंड, बाळासाहेब घोलप, विजय लावंड यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुनीता देवी, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

.

.

.

.

