March 1, 2026
IMG-20260212-WA0033

डॉ. व्होटकर पुल ते श्रीदेवीचामाळ रस्ता नगरपरिषदेकडे देण्याचा प्रस्ताव

करमाळा, प्रतिनिधी – शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या ग्रामीण भागाचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश करावा तसेच श्री कमलाभवानी मंदिर ते शहर हद्दीतील डॉ. व्होटकर पुल हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला रस्ता नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांनी नगराध्यक्षा मोहिनी सावंत आणि मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग होऊन सुमारे एक ते दीड किलोमीटर परिसरात नागरी वस्ती निर्माण झाली आहे. अनेक घरे व बंगले उभारले गेले असले तरी हा भाग शहर हद्दीबाहेर असल्याने नागरिकांना गटारी, पाणीपुरवठा, रस्ते, वीज आदी मूलभूत नागरी सुविधा नियमितपणे उपलब्ध होत नाहीत. परिणामी या भागातील रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे सदर ग्रामीण भागाचा शहर हद्दीत समावेश केल्यास नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा पुरविणे शक्य होईल. तसेच नगरपरिषदेच्या कर रचनेतून महसुलात वाढ होऊन शहराच्या विकासालाही चालना मिळेल.

तसेच करमाळ्याचे आराध्य दैवत श्री कमलाभवानी मंदिर ते शहर हद्दीतील डॉ. व्होटकर पुल या दरम्यानचा रस्ता सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. हा रस्ता नगरपरिषदेकडे हस्तांतरित करून मध्यभागी डिवायडर उभारावा तसेच स्ट्रीट लाईटचे पोल बसवावेत, अशीही मागणी सौ. स्वाती महादेव फंड आणि सामाजिक कार्यकर्ते महादेव फंड यांनी केली आहे.

वरील दोन्ही विषय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेऊन नगर परिषदेकडून ठराव मंजूर करून शासन स्तरावर प्रस्ताव पाठविण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *