कोर्टीतील महिलांच्या आनंदावर विरजण
करमाळा, प्रतिनिधी – सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पद्मजा इंगवले यांनी कोर्टी येथे महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विजेत्या महिलांना बक्षीस स्वरूपात किंमती वस्तू भेट देण्याचे नियोजन होते. मात्र हा खेळ घेण्याच्या दिवशीच आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती इंगवले यांनी दिली आहे.

तालुक्यातील जेऊर येथील सामाजिक कार्यकर्त्या व महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र परिवाराच्या महिला प्रमुख पद्मजा इंगवले यांनी तालुक्यातील विविध भागात हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले होते. दरम्यान ग्रामीण भागातील महिलांची मागणी लक्षात घेऊन इंगवले यांनी मंगळवार दि.१३ रोजी सायंकाळी ४ वाजता संक्रांती निमित्त कोर्टी येथील माध्यमिक शाळेत महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सायंकाळी कार्यक्रम असल्यामुळे मंगळवार सकाळपासूनच मंडप, स्पीकर, महिलांना बसण्यासाठी खुर्च्या, स्टेज, निवेदक, प्रायोजक आदी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होते. या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी कोर्टीसह पंचक्रोशीतील महिलांनी घरची सर्व कामे आटपून आणि सणाच्या हिशोबाने नेटका पेहराव करून कोर्टी येथील कार्यक्रम स्थळी जमण्यास सुरुवातही केली.

मात्र या दरम्यानच राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि नेमकी चार वाजता पासूनच आचारसंहिता लागू झाली. श्रीमती इंगवले यांच्याकडे शिवसेनेचे राजकीय पद असल्याने त्यांनाही हा कार्यक्रम घेण्यास मर्यादा येत होत्या. त्यामुळे त्यांनी हा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

कार्यक्रम स्थगित करावा लागत असला तरी कार्यक्रमाच्या उत्साहात जमलेल्या महिला वर्गाला आचारसंहितेच्या कारणामुळे कार्यक्रम संगीत करावा लागत आहे असे सांगणे श्रीमती इंगवले यांना जड जात होते. मात्र उपस्थित महिला वर्गाने इंगवले यांची द्विधा मनस्थिती लक्षात घेऊन मोठ्या मनाने आपल्या उत्साहाला आवर घातला आणि आचारसंहितेनंतर पुढील काळात हा कार्यक्रम घेण्याचे सुचवले.

महिलांच्या या सामंजस्याने श्रीमती इंगवले या भारावल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. यानंतर उपस्थित महिलांनी शाळेच्या प्रांगणातच भोगीच्या निमित्ताने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सुरू केला आणि या कार्यक्रमात इंगवले यांना सहभागी करून घेत त्यांची मनस्थिती पूर्ववत केली.

.

.

.

