पडद्यामागूनच्या हालचाली मात्र वाढल्या
करमाळा, प्रतिनिधी – अर्ज भरण्यासाठी गुरुवारचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता होती. मात्र करमाळा नगर पालिका निवडणुकीसाठी गुरुवार दि. १३ रोजी कोणताही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी दिली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सात दिवस दिलेले असताना सुरुवातीचे चार दिवस कोणताही अर्ज भरला गेल्या नसल्याने पडद्याआडून राजकीय हालचाली होत असल्याचा कयास जाणकारांकडून बांधला जात आहे.

करमाळ्यासह राज्यातील अनेक ठिकाणी नगरपालिका निवडणुकीसाठी बुधवारपर्यंत अर्ज दाखल झाले नव्हते. निवडणूक अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव, अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया, गट किंवा पक्षांतून इच्छुक उमेदवारांची निवड, संभाव्य युती किंवा आघाडीचे प्रयत्न, संधी न दिल्यामुळे नाराजांची समजूत, समजूत न निघाल्यामुळे बंडखोरी, योग्य मुहूर्त आदी कारणांमुळे उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया लांबलेली आहे. असे असले तरी अर्ज दाखल करण्यासाठी दि.१७ पर्यंत असलेली मुदत लक्षात घेऊन सामान्यांकडून पालिकेवर प्रशासक राजच राहतो किंवा निवडणूक बिनविरोध होते काय अशा मिश्किल प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

करमाळा नगर पालिका निवडणुकीत उतरलेल्या जगताप आणि बागल या गटांना पक्षीय लेबल असून सावंत गट मात्र करमाळा शहर विकास आघाडीच्या बॅनर खाली निवडणूक लढवत आहे. दरम्यान शिवसेनेच्या वतीने करमाळा आणि कुर्डूवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून मा.आ. जयवंतराव जगताप यांची गुरुवारी नियुक्ती झाली आहे तर शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख प्रियांका गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे सादर केला आहे. याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर पडद्याआडून अनेक राजकीय घडामोडी होत असून निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत होत असलेल्या विलंबा बाबत जाणकारांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

रविवारची सुट्टी वगळता शुक्रवार, शनिवार आणि सोमवार सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत असे केवळ तीनच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले असून नगराध्यक्ष पद आणि दहा प्रभागातून वीस जागांसाठी असलेली इच्छुकांची संख्या पाहता शुक्रवारपासून तरी निवडणूक अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

.

.

.

.

.
