उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार वेग
करमाळा, प्रतिनिधी – नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रस्थापित गट आणि प्राप्त राजकीय परिस्थिती यांचा मेळ घालून नगराध्यक्षपदासह करमाळा नगरपालिकेच्या दहा प्रभागातून वीस उमेदवार देण्याच्या हालचालींचा वेग संथच दिसून येत होता. मात्र सोमवारी परदेशी गटाच्या सावंत गटात झालेल्या जाहीर प्रवेशानंतर नगरपालिकेच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

प्रस्थापित जगताप गट शिंदे सेनेत असला तरी खासदार मोहिते पाटील आणि आमदार नारायण पाटील यांच्याशी जगताप आणि सावंत हे दोन्हीही गट संधान बांधून असल्याने या दोन्ही गटात युती होण्याची दाट शक्यता होती. मात्र सर्वसाधारण असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी दोन्हीही गट आग्रही असल्याने त्यांच्यात समेट घडून आली नाही. याशिवाय अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्थानिक भाजपाचे एकत्रिकरण घडवून आणून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यानंतर सोमवारी प्रभाग क्रमांक पाच मधील अमोल परदेशी यांचे बंधू विक्रम परदेशी यांना जगताप गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने त्यांनी जगताप गटाला रामराम करत सावंत गटात प्रवेश केला आणि जगताप-सावंत युतीच्या शक्यतेवर पडदा पडला आहे. त्यामुळे करमाळा नगरपालिकेची निवडणूक तिरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसला तरी आता नगराध्यक्षपदासह प्रभागांतील लढती ही स्पष्ट झाल्यामुळे मंगळवारपासून गट किंवा पक्ष यांच्यामार्फत इच्छुक उमेदवारांचे उमेदवारीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगवान होईल, असे वाटते आहे.

.

.

.

.

.
.
