March 1, 2026
IMG-20251111-WA0067

गुरुवारच्या मुहूर्ताची चर्चा

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी ही कोणताही अर्ज दाखल झाल्या नसल्याने दाखल अर्ज संख्या निरंक असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी दिली आहे.

जगताप आणि सावंत गटाच्या संभाव्य युतीची शक्यता लक्षात घेता पहिले दोन दिवस अर्ज दाखल झाले नाहीत, असे वाटत होते. मात्र जगताप गटाकडून उमेदवारी डावलल्या गेलेल्या उमेदवारांनी सावंत गटात प्रवेश केल्यानंतर या युतीची शक्यता जवळपास मावळली आहे. त्यामुळे करमाळा नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत स्पष्ट झाली आहे. जगताप गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या अर्धांगिनी सौ. नंदीनीदेवी जयवंतराव जगताप यांचे नाव चर्चिले जात असले तरी नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची सरस निरस मानाने पारख केली जात असल्याने जगताप गटाची अंतिम यादी बुधवारपर्यंत जाहीर झाली नव्हती. नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी सौ. जयश्री विलासराव घुमरे यांचे नाव फायनल झाल्याची तसेच नगरसेवक पदासाठींच्या उमेदवारांबाबत बुधवारी उशिरा निर्णय होण्याची चर्चा होती. तर ‘एकला चलो रे’चा नारा देत करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी सर्व प्रभागातून उमेदवार देण्याचा चंग बांधलेल्या सावंत गटाकडून माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी सौ. मोहिनी संजय सावंत यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ठरलेली असून अखत्यारीतील प्रभागांसह इतर प्रभागांतूनही सावंत गटाला येऊन मिळणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी फिक्स केली जात आहे.

विविध कारणांनी तीन दिवसांपर्यंत उमेदवारी अर्ज भरले गेले नसले तरी गुरुवारचा मुहूर्त गाठण्यासाठी अनेक जण थांबल्याचे बोलले जात होते. त्यामुळे बुधवारी म्हणजेच अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशीही कोणताही अर्ज दाखल करण्यात आला नसला तरी प्रचारासाठी असलेला अल्प कालावधी लक्षात घेऊन आज म्हणजे गुरुवारी अनेकांचे अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे.

.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *