दहा प्रभागांतून वीस जागांसाठी ७१ उमेदवार मैदानात
करमाळा, विशाल परदेशी – करमाळा नगरपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत नगराध्यक्ष पदाच्या ३ तर नगरसेवक पदाच्या ६५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी एकूण ७१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुरुवातीला नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून सौ. सुनीता देवी आणि सौ. जयश्री घुमरे यांपैकी एका नावाची आणि भाजपा आणि राष्ट्रवादी युती होऊन नगरसेवक पदाच्या प्रत्येकी १० जागा देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मंगळवारी सौ. देवी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली असली तरी भाजपाच्या वतीने २० अर्ज दाखल करण्यात आल्याने राष्ट्रवादीने ही जवळपास १२ उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते. यादीवरून दोन दिवस नाराजी नाट्य दिसून येत असताना शुक्रवारी भाजपा आणि राष्ट्रवादी युती बाबत कोणताही प्रस्ताव न आल्याने सरते शेवटी राष्ट्रवादीने युती धर्म म्हणून भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देत नगरसेवक पदाच्या आठ जागा लढविण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान शुक्रवारी करमाळ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, भाजपाने सुरुवातीपासूनच करमाळ्यातील नगराध्यक्षपदा सह सर्व जागा स्वतंत्र लढविण्याचे ठरविले होते. करमाळ्यातील राष्ट्रवादी बरोबर युतीबाबत आपल्यासोबत कोणासोबत कोणतीही बोलणी किंवा जागा देण्यासंबंधी ठरले नसल्याचे स्पष्ट केले.

यामुळे करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक तिरंगी तर नगरसेवक पदाच्या काही प्रभागात तिरंगी तर काही प्रभागात चौरंगी लढत होणार असल्याचे दिसत आहे.

.

.

.

.

.
