वरकुटे येथील शहीद स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील यांच्याकडून तरुणाईला बाळकडू
करमाळा, प्रतिनिधी – सर्व समाजाच्या भल्यासाठी माझी प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे प्रयत्न सुरू असताना राज्यातील तरुणाईने शेती आणि व्यवसायांकडे लक्ष केंद्रित केले तर मला सरकारकडून सवलतींसह शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी वेळ उपलब्ध होईल, असे प्रतिपादन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. करमाळा तालुक्यातील वरकुटे मूर्तीचे येथील शहीद जवान नवनाथ गात यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी वरकुटे येथे शहीद जवान नवनाथ गात स्मारक समितीच्या वतीने रक्तदान शिबिर, किर्तन आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प.गणेश महाराज बरगे यांच्या सुश्राव्य किर्तन सोहळ्यातील पुष्पांजलीच्या कार्यक्रमानंतर जरांगे पाटील यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रातून पुण्याचे उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे, सीमेवर दाखवलेल्या शौर्याबद्दल निवृत्त कॅप्टन (सेना मेडल) रावसाहेब साळुंखे, शैक्षणिक क्षेत्रातून करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील आदलिंग वस्ती जि.प.प्राथ. शाळा, क्रीडा (कुस्ती) क्षेत्रातून कुमार महाराष्ट्र केसरी शिवम आण्णासाहेब ढाणे तर कृषी क्षेत्रातून करमाळा ऑरगॅनिक ग्रुप यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, सततच्या उपोषणांमुळे माझी प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे लग्न सोहळे, हरिनाम सप्ताह आदी सर्वच कार्यक्रमांना उपस्थित राहणे मला शक्य होत नाही. करमाळा तालुक्यात शहीद जवान स्मृतीचा कार्यक्रम असल्याने हा कार्यक्रम टाळणे मला योग्य वाटले नाही. ज्याप्रमाणे गात कुटुंबातील एक जवान शहीद झाला असला तरी त्याच कुटुंबातील दुसऱ्या तरुणानेही सीमेवर देश रक्षणाचे कर्तव्य बजावले, त्याचप्रमाणे राज्यातील तरुणाईने ही बांध किंवा शेतरस्त्यांसाठी तंटे न करता आणि अनावश्यक कामात वेळ न घालवता स्वत:ला एखाद्या व्यवसाय किंवा शेती कामात झोकून दिले तर कुटुंबीयांना आधार तर मिळेलच परंतु राज्यातील तरुणाई उद्योग धंद्यात रमल्यामुळे मलाही शासनाकडून विविध मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी वेळ मिळेल.

वरकुटे येथे पोहोचताच करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी जरांगे पाटील यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी जेसीबी तून पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यक्रमातील आपल्या मनोगता दरम्यान जरांगे यांनी कार्यक्रम ठिकाणी पोहोचताना जामखेड ते करमाळा या अत्यंत खराब असलेल्या रस्त्याच्या परिस्थितीबाबत बोलून व्यासपीठावर उपस्थित करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील यांना हा रस्ता त्वरित नूतनीकरण करण्याची जाहीर सूचना केली.

शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ८५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदान करण्यात महिलांची संख्या लक्ष्मी होती. करमाळ्यातील कमला भवानी ब्लड बँक तसेच बार्शी येथील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी यांनी या शिबिरात रक्त संकलनाचे काम केले.

या कार्यक्रमात पुरस्कारार्थी उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे यांच्यासह आ. पाटील, ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश करे पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्मारक समितीच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मध्ये पीएचडी केलेले सालसे येथील डॉ. संदीप संभाजी ओहोळ आणि कोलकता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटची मानद डॉक्टरेट पदवी मिळवलेल्या डॉ. गणेश करे पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी वरकुटे ग्रामपंचायत,करमाळा तालुका सकल धनगर समाज तसेच करमाळा तालुका संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शहीद जवान नवनाथ गात स्मारक समितीचे सचिव नीलकंठ ताकमोगे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर समितीचे अध्यक्ष नागनाथ गात यांनी उपस्थितांचे आभार मानले. सचिन गाडेकर आणि धनंजय दिरंगे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, जिल्हा परिषद सदस्या रश्मी बागल- कोलते, करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे अक्रूर शिंदे, जि.प. सदस्य आण्णासाहेब ढाणे यांसह अनेक आजी माजी सैनिक, वरकुटे पंचक्रोशीसह करमाळा व माढा तालुक्यातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहीद जवान नवनाथ गात स्मारक समिती, शहीद जवान नवनाथ गात मित्र मंडळ व वरकुटे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
