March 7, 2026
IMG-20260306-WA0018

करमाळा, प्रतिनिधी : जीव धोक्यात घालून नागरिकांचे जीवन प्रकाशमान ठेवण्यासाठी २४ तास तप्तर सेवा देणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत, वायरमन दिनाचे औचित्य साधून शिवजयंती उत्सव समिती, करमाळा यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)च्या वायरमन, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बुधवार दि.४ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हा सत्कार समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.

यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ऊन-वारा-पाऊस असो किंवा रात्रीचा प्रसंग असो, वायरमन आणि वीज कर्मचारी जिवाची पर्वा न करता आपली सेवा बजावत असतात. नागरिकांना अखंड वीजपुरवठा मिळावा यासाठी ते सतत तत्पर असतात. अनेकदा आपण विजेच्या सोयींचा आनंद घेतो, मात्र त्यामागे या कर्मचाऱ्यांचे मोठे कष्ट असतात. त्यांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी करमाळा शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना महावितरणचे उपअभियंता आशिष कलावते यांनी समितीचे आभार मानले. कामाच्या व्यापात अनेकदा धावपळ होते; मात्र समाजाकडून अशा प्रकारे कामाची पोचपावती मिळाली की काम करण्याचा उत्साह द्विगुणित होतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. याबरोबरच काही तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तो बिघाड दुरुस्त करण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी किमान अर्धा तास वाट पाहूनच खंडित वीजपुरवठ्या बाबत चौकशी करण्याचे सहकार्य करावे अशी अपेक्षा उप अभियंता कलावते यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास शिवजयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी आणि करमाळ्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *