करमाळा, प्रतिनिधी – रविवार दि.१ रोजी करमाळा शहरातील हॉटेल राजयोगच्या राजयोग हॉल मध्ये सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे तेरावे विज्ञान अधिवेशन पार पडले. यावेळी विज्ञान विषयाच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत शहरातील महात्मा गांधी विद्यालयाला सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचा “आदर्श शाळा” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय शहरातील जुनी आणि नावाजलेली शाळा आहे. या शाळेत पूर्वीपासूनच विज्ञान विषयाच्या गुणवत्ता वाढीसाठी नियमित अभ्यासक्रमा सोबतच सातत्यपूर्ण व उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात येतात. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेचे अनेक विद्यार्थी नेहमीच प्राविण्य मिळवत असतात. विविध ठिकाणी असलेले विज्ञान प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसेच विविध विज्ञान उपक्रमांमध्ये विद्यार्थी सहभागी व्हावेत म्हणून शाळेचा सक्रिय सहभाग असतो. शाळेची विज्ञान विषयातील प्रगती, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न व शिक्षकांचे मार्गदर्शन व कार्य या सर्व बाबींचा विचार करून करमाळा तालुक्यातून आदर्श शाळा म्हणून महात्मा गांधी विद्यालयास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण पाटील, उप मुख्याध्यापक अनिस बागवान, पर्यवेक्षिका सुनिता नवले, महेश कांबळे तसेच सहकारी विज्ञान शिक्षक मंगेश तरकसे, संदीप पुजारी, शैलेश शेलार, विज्ञान शिक्षिका विजया तीवाटणे या सर्वांनी मिळून हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी प्रा. रामदास झोळ, नगराध्यक्षा मोहिनी सावंत, जिल्हा परिषद सदस्या रश्मी बागल, विश्वस्त शंभूराजे जयवंतराव जगताप, पुणे विभाग माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, राज्य विज्ञान महामंडळाचे सदस्य लक्ष्मीप्रसाद मोहिते, सोलापूर जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संजय जंवजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.आ. जयवंतराव जगताप, विश्वस्त वैभवराजे जगताप, शंभूराजे जगताप यांनी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
.
.