पळून गेलेल्या पित्याला बार्शी येथून घेतले ताब्यात
करमाळा, विशाल परदेशी – तालुक्यातील केतुर स्टेशन येथील एकाने आपल्या दोन अपत्यांना हिंगणी हद्दीतील स्वतःच्या शेतातील विहिरीत टाकून देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. करमाळा तालुक्यातील हिंगणी येथे शनिवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे. या दुर्दैवी घटनेत दोन्ही भावंडांचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार करमाळा तालुक्यातील केतुर स्टेशन येथील सुहास जाधव या युवकाने त्याच्या हिंगणी हद्दीतील शेतातील विहिरीत स्वतःच्या आठ वर्षीय जुळ्या मुला-मुलीला विहिरीत ढकलून पळून जाण्याचा प्रयत्न शनिवारी केला. या घटनेत शिवांश आणि श्रेया या दुर्दैवी भावंडांचा मृत्यू झाला असून सुहास जाधव याला करमाळा पोलिसांनी बार्शी येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान बार्शी येथून ताब्यात घेतलेल्या सुहास याने विष प्राशन केले असल्याचे त्याने स्वतः सांगितले आहे. त्यामुळे बार्शी येथील प्राथमिक उपचारानंतर त्याला सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी सायंकाळी सहा वाजता मृत शिवांश आणि श्रेया यांचे मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत करमाळा पोलीसांची या घटनेबाबत पुढील कारवाई सूरु होती.

सुहास जाधव हा महावितरण मध्ये नोकरीला आहे. तालुक्यातील झरे येथील सब स्टेशन वर तो ऑपरेटर चे काम करतो. त्याने दोन्ही अपत्यांना का मारले याबाबतचे कारण समजू शकले नाही.

.

.

