करमाळा, प्रतिनिधी – भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महायुती मध्ये समाविष्ट करून न घेता अपमानास्पद वागणुक दिली. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी कमळाला पाठींबा जाहीर करणे म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांची माती करण्यासारखे असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे- पाटील यांनी केला आहे.

याबाबत सविस्तर बोलताना मांढरे यांनी सांगितले आहे की, करमाळा नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपाबाबत भाजपावर विश्वास ठेवून होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला गाफील ठेवत भाजपने शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकही जागा न सोडता घात केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी उमेदवारांची जुळवाजुळव करण्याची वेळ येऊन तुरळक ठिकाणीच उमेदवार उभा करता आले.

अशाप्रकारे अपमानास्पद वागणूक दिली असतानाही भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर करणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अवस्था ‘दोन हाणा पण मला तुमची म्हणा…’ अशी झाली आहे. ही बाब अनेक निष्ठावंत, स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी निषेधार्थ आहे. अशामुळे स्थानिक पातळीवर चाललेल्या कुरघोडीच्या राजकारणात सामान्य कार्यकर्त्यांचे राजकीय करियर बरबाद होत असल्याचे मत मांढरे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा चा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे हनुमंत मांढरे- पाटील यांनी शेवटी सांगितले आहे.

.

.

.
