दोन दिवसांच्या यात्रेत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
करमाळा, प्रतिनिधी – तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या सीनेकाठच्या श्री क्षेत्र संगोबा येथील आदिनाथ महाराजांच्या यात्रेला रविवारी उत्साहात सुरुवात झाली. श्री आदिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी शहर व तालुक्यातील भाविकांची पहाटेपासूनच मांदियाळी दिसून आली.

गतवर्षीच्या दिवाळीच्या दरम्यान पूर परिस्थितीचा सामना केलेल्या संगोबा भोवतालच्या खांबेवाडी, बोरगाव, पोटेगाव, तरटगाव, बिटरगाव (श्री) येथील शेतकरी वर्गासह करमाळा शहर व तालुक्यातील भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त तालुक्याचे ग्रामदैवत समजल्या गेलेल्या श्री आदिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी रविवारी पहाटेपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली. मंदिरातील शिव पिंडीवर नव्यानेच चांदीचे सुरेख आवरण घडवण्यात आले आहे. प्रत्येक भाविकाला मंदिराच्या गाभार्यात प्रवेश असल्याने महिला पुरुषांसह आबाल वृद्धांनी शिवपिंडीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भाविकांसाठी मंदिराच्या आवारात महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.

दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत श्रीफळ, बेलपत्र, बेलफळ, हार-फुले, विभूती, गुलाल, बुक्का, चंदन अशा पूजेच्या वस्तूंसह प्रसादासाठी पेढे, खडीसाखर आणि विविध खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत. याशिवाय मनोरंजनासाठी लहान-मोठ्या पाळण्यांसह विविध खेळणी, नित्य उपयोगी वस्तूंच्या दुकानांमध्ये खरेदी सारखी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे.

रविवारी सकाळी लवकर संगोबा पंचक्रोशी सह करमाळा शहरातील भाविकांची विशेष गर्दी दिसून आली. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूकडून पाणी साठून असल्याने भाविकांनी हातपाय धुण्यासाठी घाट पायऱ्यांवर गर्दी केली. दहा वाजेनंतर तालुक्यासह तालुक्याच्या आसपासच्या भाविकांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले. दुपारी बारानंतर काही प्रमाणात गर्दी ओसरली असली तरी दुपारी तीन नंतर ही गर्दी पुन्हा वाढू लागली. मंदिराकडे जाणारे अरुंद रस्ते, नदीपात्रात पाणी असल्यामुळे वाहने लावण्यासाठी जागेची कमतरता आणि भाविकांच्या बेशिस्त पणामुळे वाहतूक विस्कळीत होत असली तरी वाहतूक पोलीसांनी भर उन्हात वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवली.

पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी स्वतः मंदिराच्या आवारात थांबत गर्दी आणि विशिष्ट वर्तणुकीवर नियंत्रण ठेवले. दरवर्षीप्रमाणे एकाच वेशीतून प्रवेश व निर्गमन व्यवस्था मोडीत काढत मंदिराच्या मुख्य वेशीतून प्रवेश आणि बाजूला असलेल्या दुसऱ्या वेशीतून निर्गमन अशी व्यवस्था ठेवल्यामुळे दर्शन व्यवस्थेत सुरळीतपणा जाणवला. देवस्थानाच्या आपत्कालीन मदत व प्रतिसाद कक्षाकडून समालोचन करत गर्दीला आवर घालण्याचे प्रयत्न दिवसभर सुरू होते. मंदिर परिसरात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा मार्फत वैद्यकीय मदत कक्ष ही तप्तरतेने सुरू आहे.

आज (सोमवार) रोजीही ही यात्रा रात्री उशिरापर्यंत चालणार असून पूर परिस्थितीचा सामना करून या परिसरातील शेतकरी वर्ग नव्याने उभा राहिलेला असल्याचे भाविकांच्या उत्साहावरून दिसून येत आहे.
