March 1, 2026
IMG-20251220-WA0016(1)

करमाळा, प्रतिनिधी – दैनंदिन जीवनात नेहमी वापरात येणाऱ्या गणितीय संकल्पनांंचे शालेय विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी नवभारत इंग्लिश स्कूलचा गणित प्रदर्शनाचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणारा असल्याचे मत मुथा नॉलेज फाऊंडेशनच्या संस्थापिका ज्योती मुथा यांनी व्यक्त केले. महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या गणित दिनानिमित्त शहरातील नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्समध्ये शुक्रवार दि. १९ रोजी गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

या प्रदर्शनात शाळेच्या २३१ विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून गणितातील कठीण संकल्पना सोप्या करून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शाळेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या प्रदर्शनाचे न.पा. मुला मुलींची शाळा नं. ४ चे विक्रम राऊत, मुथा नॉलेज फाऊंडेशनच्या संस्थापिका ज्योती मुथा, प्राचार्य बाळासाहेब नरारे, संतोष बलदोटा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून तसेच फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सौ. मुथा यांच्यासह राऊत गुरुजी, प्रा. शिंदे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत या कल्पकतेला वाव देण्यासाठी नवभारत इंग्लिश स्कूलने आयोजित केलेल्या गणित प्रदर्शनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. उद्घाटनानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या गणितीय प्रकल्पांची पाहणी करून त्यांच्या कल्पकतेला दाद दिली.

या प्रदर्शनात प्रा. विष्णू शिंदे, प्रा. सारिका विटूकडे, नागेश मोहिते, प्रा. राजेंद्र चिखले यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहीले. शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षिका मेघाली शेटे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती काळे यांनी केले. श्री गिरीधरदास देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, संचालक विजयकुमार दोशी यांच्यासह पालकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *