September 22, 2026
जामीन

करमाळा, प्रतिनिधी – कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी असलेल्या माया रामदास झोळ यांनी दाखल केलेला नियमित जामीन अर्ज बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज व्ही. केंद्रे यांनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी हा आदेश दिला आहे.

करमाळा तालुक्यातील घोटी व उंदरगाव येथे हाय प्रोफाईल आश्रम चालविणाऱ्या भोंदू बाबा मनोहर भोसले याच्यावर भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ मधील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. तपासा दरम्यान या गुन्ह्यात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ, सचिवा माया झोळ यांच्यासह संस्थेच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग पोलिसांना दिसून आलेला आहे. आरोपींपैकी रामदास झोळ हे फरार असून अटकेत असलेल्या माया झोळ यांचे जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या दरम्यान मंगळवारी झालेल्या सुनावणीत बचाव पक्षाने आरोपीचा गुन्ह्याशी संबंध नसल्याचा, तसेच तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाल्याने जामीन देण्याची मागणी केली होती. मात्र, सरकार पक्षाने आरोपीचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे सांगत साक्षीदारांवर दबाव, पुराव्यात छेडछाड व फरार होण्याची शक्यता व्यक्त केली.

बार्शी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज व्ही. केंद्रे यांनी उपलब्ध कागदपत्रे व साक्षीदारांचे जबाब विचारात घेत माया झोळ यांचा नियमित जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!