March 1, 2026
IMG-20251223-WA0060

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगरपालिका निवडणुकीत उत्तुंग यश मिळवल्याबद्दल करमाळा शहर विकास आघाडीचे नेते सुनील सावंत यांचा राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा मतदार संघाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी मंगळवारी पुणे येथे सत्कार केला. या सत्काराचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर करमाळ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

करमाळा नगरपालिका निवडणुकीत सावंत गटाच्या करमाळा शहर विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवून नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदाच्या सर्वाधिक आठ जागा काबीज केल्या आहेत. यानंतर सावंत गटाच्या विजयी उमेदवारांवर शहर व तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा मतदार संघाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांचा पुणे येथील कार्यालयात सत्कार केला.

यावेळी आ. तानाजी सावंत आणि करमाळा शहर विकास आघाडीचे नेते सुनील सावंत यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे आणि करमाळा शहर विकास आघाडीचे नूतन नगरसेवक दादा इंदलकर हे उपस्थित होते.

मी माझ्या खाजगी कामानिमित्त पुणे येथे असल्याचे आमदार तानाजी सावंत यांना कळाल्यानंतर त्यांनी आम्हाला कार्यालयात बोलावून घेतले आणि नगरपालिकेत मिळालेल्या यशाबद्दल माझा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. आ. सावंत यांच्याशी आमची भाऊबंदकी असल्याने हा अनौपचारिक सत्कार होता. याचा कोणताही राजकीय संबंध नाही.
-सुनील सावंत,
करमाळा शहर विकास आघाडी.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *