छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील नाट्य ठरले कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील रावगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला.

बुधवार दि.४ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, डॉ. गणेश करे पाटील व प्रा.विष्णू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या स्वागता नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. शिक्षण, शिस्त आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित करत उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. करे पाटील यांनी आपल्या मनोगतातून पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या प्रगतीचे मनापासून कौतुक करत ग्रामीण भागात असूनही विद्यालयाने शिक्षण, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

कार्यक्रमादरम्यान एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनासह छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील नाट्य प्रयोगाने उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाला रावगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व आजी-माजी पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विजय कोळेकर यांच्यासह शिक्षक भाऊसाहेब सरडे, किरण परदेशी, हनुमंत रासकर, प्रताप बरडे, विलास पाटील, विशाल राठोड, रुपेश मोरे, ज्ञानेश्वर निंबाळकर, सुहास कानगुडे आणि सुरेश अण्णा बरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

.

.

