महीला शेतकरी मारणार संबंधित मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे…
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील रूपांतरीत साठवण तलावांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत वारंवार पाठपुरावा करूनही यामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई न झाल्यामुळे मंगळवार दि.१६ डिसेंबर रोजी पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन अर्धनग्न आंदोलन व संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या प्रतिमेला महीला शेतकऱ्यांच्या हस्ते जोडे मारो आंदोलन करणार असल्याची माहिती प्रहारचे तालुकाप्रमुख संदीप तळेकर यांनी दिली आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील केम रुपांतरीत साठवण तलाव योजनेसाठी देण्यात आलेल्या रु.२.९४ कोटींच्या दायित्वाचा विचार करता सदर योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे तसेच धरणास ग्राउटींग न करताच योजनेचे दायित्व मंजूर केले असल्याबाबत प्रहारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि.२२/१०/२०२५ रोजी तक्रार केली होती. या सर्व प्रकरणाच्या चौकशी शिवाय शिवनेरी कंस्ट्रक्शनचे शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांचे कुठलेही देयक अदा करण्यात येऊ नये, तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कंत्राटदार व अधिकारी यांचेवर गुन्हे दाखल होण्याबाबत हलगी नाद आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले होते. सदर प्रकरणाची चौकशी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी दक्षता व गुणनियंत्रण (पुणे) यांचे मार्फत करण्यात येणार असल्याचे कळवल्यामुळे प्रहारने ते आंदोलन स्थगित केलेले होते.

मात्र आता जवळपास २० दिवस झाले तरी याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मंगळवारी हे आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहारने या निवेदनातून दिला आहे.

.

.

