करमाळा, विशाल परदेशी – करमाळा शहरातील समस्यांकडे प्रस्थापितांचे दुर्लक्ष, त्यामुळे झालेल्या गैरसोयींमुळे जनतेची झालेली हेळसांड आणि त्यातून निर्माण झालेल्या नाराजीला संधी समजून स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय सावंत गटाच्या पथ्यावर पडला आहे. त्यातच निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रस्थापितांकडून निष्ठावंतांना योग्य न्याय न दिल्याने निर्माण झालेली नाराजीही सावंत गटाचा विजय सुकर करण्यासाठी उपकारक ठरली आहे.
मागील निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता पारंपारिक गटांमध्ये युत्या/आघाड्या होऊन २०२५ ची निवडणूक पार पडणार, असा अंदाज सुरुवातीला सर्वांकडूनच व्यक्त होत होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र भाजपाचा ‘शत प्रतिशत भाजपा’चा नारा, भाजपासोबत युती करून जागा वाटपाचा समाधानकारक तोडगा न निघाल्याने राष्ट्रवादीचा ‘एकला चलो रे’ चा सूर, शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागातून दिलेले उमेदवार आणि सावंत गटाचा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय या सर्व गोष्टी सावंत गटासाठी फायदेशीर ठरत गेल्या.
गेली पाच टर्म नगरपालिकेवर जगताप गटाच्या असलेल्या अधिपत्यामुळे जगताप गटाकडून नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी अनेक निष्ठावंत इच्छुक होते. मात्र मा.आ. जयवंतराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर इच्छुक उमेदवारांबाबतची समीकरणे बदलत गेली. जगतापांच्या या निर्णयानंतर काहींनी स्वतःहून उमेदवारीच्या इच्छेला मुरड घातली तर उमेदवार निवडीचे अधिकार सर्वस्वी जगताप यांच्याकडे असल्याने उमेदवार निवडीनंतर काही इच्छुकांच्या पदरी निराशा पडली. या निराशेतून प्रभाग क्रमांक पाच मधून जगताप गटाचे निष्ठावंत गणले गेलेल्या अमोल परदेशी यांचे बंधू विक्रम परदेशी यांच्या उमेदवारीची शक्यता धूसर झाल्याने त्यांनी जगताप गटाशी फारकत घेऊन समर्थकांसह सावंत गटात प्रवेश केला.
या प्रवेशानंतर शहराच्या सिद्धार्थनगर भागातील जितेश कांबळे आणि संदीप कांबळे आणि समर्थक, हिंदू खाटीक समाज, बागल समर्थक आणि माजी नगरसेवक मुकुंद कांबळे, जगताप समर्थक अमोल जाधव आदींचे प्रवेश आणि शिवसेना (ठाकरे) तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, राष्ट्रवादीचे हनुमंत मांढरे यांची साथ लाभत गेल्याने सावंत गट अधिक बळकट होत गेला. करमाळा नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचा ध्यास घेतलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांना एकत्र केले होते. यानंतर भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या देवी आणि घुमरे यांतून देवी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर तसेच भाजपाकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांना मात्र उमेदवारी न मिळाल्यांची छुपी नाराजीही सावंत गटाकडे आकर्षित झाल्याचे बोलले गेले. या सर्व घालमेलीत इतर गटांच्या घराणेशाहीच्या नावाने नाक मुरडलेल्या जनतेने सावंत कुटुंबातून नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवक मात्र लिलया निवडून दिले आहेत. याशिवाय उरलेल्या सात जागांवरही सामान्य जनतेशी नाळ जोडलेले उमेदवार निवडून आलेले आहेत. आता भाजपाचे निवडून आलेले सात नगरसेवक, जगताप गटाचे पाच नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद आणि आठ नगरसेवकांच्या सहभागातून नगरपालिकेचा कारभार सुधारण्याची अपेक्षा करमाळ्याची जनता करत आहे.