करमाळा, प्रतिनिधी – शहरातील फंड गल्ली येथील अर्जुन (तात्या) फंड (फंड सर) यांचे आज शुक्रवार दि.१३ रोजी पहाटे ५.०० वाजता वार्धक्याने दुःखद निधन झाले. कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयात गणित विषयाचे हाडाचे शिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ शहर व तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची उपलब्धी ठरला होता.
शांत, संयमी, अभ्यासू स्वभाव आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने गणित विषय शिकवत असल्याने गणित विषय अवघड समजणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गणिताची गोडी लागत असे. सेवानिवृत्तीनंतरही अनेक वर्षे त्यांनी गरजू मुलांचे गणित विषयाचे तास घेऊन आपले ज्ञानदान सुरू ठेवले होते. याशिवाय प्रेमळ स्वभावामुळे फंड गल्लीसह आप्तेष्ट व नातेवाईकांना ते हवेहवेसे वाटत. यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे.
आज (शुक्रवारी) दुपारी २ वाजता फंड गल्ली येथील त्यांच्या राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून शहरातील विकास नगर येथील दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पाठीमागे पत्नी, ३ मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे ते वडील होत.
