March 1, 2026
IMG-20260212-WA0037(1)

करमाळा, प्रतिनिधी – शहरासह ग्रामीण भागातील व्यापार पेठांमध्ये रुपये दहा आणि वीस रुपयांच्या नोटांच्या तुडवट्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. सुट्ट्या पैशांची मागणी आणि खराब नोटांना नकार यामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यात सर्रासपणे हुज्जत होताना पाहावयास मिळत आहे.

बँकांमधूनही रुपये दहाची नाणी आणि नोटा मिळणे दुरापास्त झाले आहे. काही प्रमाणात बँकांकडून नोटा उपलब्ध होत असल्या तरी त्या जीर्ण अवस्थेतील असतात. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी रुपये दहाच्या नाण्याला नकार देणारे व्यापारी आणि ग्राहक आता खराब नोटे ऐवजी नाणे देण्याची मागणी करत आहेत. मात्र नाण्यांचाही तुडवटा असल्याने विक्रेते दहाची जीर्ण झालेली, पारदर्शक चिकटपट्टी लावलेली खराब नोट ग्राहकांना देऊ करत आहेत व नोट नाही चालली तर परत बदलून देण्याची हमी देत आहेत. यातूनच विक्रेते आणि ग्राहकांमध्ये खटके उडत असून दहा रुपयांच्या नोटा आणि नाण्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

रुपये दहाच्या नाणी आणि नोटेच्या टंचाई बाबत बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पूर्वीप्रमाणे चेस्ट बँकेकडून नवीन नाणी आणि नोटा मिळणे बंद झाल्याने ही टंचाई निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिठाई आणि भेळ अशा दहाच्या प्रमाणात किंमती असलेल्या पदार्थांच्या खरेदी नंतर बहुतेक ग्राहक ५०, १००, २०० किंवा ५०० रुपयांची नोट देऊ करतात. अशा वेळी ग्राहकांना उरलेली रक्कम परत देताना १० रुपयांचा प्रश्न निर्माण होतो. चलनात असलेल्या अनेक नोटा जीर्ण, फाटलेल्या किंवा गळालेल्या असल्याने ग्राहक दहा रुपयांच्या नाण्याची मागणी करतात. परंतु सध्या दहा रुपयांच्या नाण्यांचीही कमतरता असल्याने नाईलाजाने १,२ किंवा ५ रुपयांची चिल्लर द्यावी लागते, त्यामुळे सुट्ट्या पैशांचा अधिकच तुडवटा जाणवतो. दहा रुपयांच्या नोटा आणि नाण्यांच्या टंचाईवर लवकरात लवकर मार्ग निघणे गरजेचे आहे.
-अक्षय चिवटे,
प्रोप्रायटर, चिवटे उपहारगृह, करमाळा.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *