March 9, 2026
IMG-20260305-WA0048

करमाळा प्रतिनिधी – राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून करमाळा शहरातील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्रिकलिंग स्टार्स येथे विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहाय्याने तयार केलेल्या विविध वैज्ञानिक संकल्पना, नाविन्यपूर्ण मॉडेल्स आणि प्रयोग पाहून उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, नवीन कल्पनांना चालना मिळावी आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेकडून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश करे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी शितल करे, डॉ. स्मिता बंडगर, डॉ. निलेश मोटे, शितल लोंढे, अभंग, आगरवाल, भिंगारे, विवेक ननवरे आणि दिग्विजय घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रदर्शनात नर्सरी ते इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धन, ऊर्जा, अवकाश संशोधन, आरोग्य आणि आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध विषयांवरील मॉडेल्स सादर केली. उपस्थित मान्यवर आणि पालकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कल्पकतेची प्रशंसा केली. दरम्यान, विज्ञान क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल डॉ. गणेश करे पाटील यांना नुकतीच ‘मानद डॉक्टरेट’ पदवी प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. करे पाटील यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि विज्ञान प्रदर्शनासाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच, संस्थेच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत नवभारत शाळेला ‘राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार’ आणि सहभागी ३५ विद्यार्थ्यांना ‘विशेष पुरस्कार’ देण्याची महत्त्वाची घोषणाही त्यांनी केली.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांच्या प्रास्ताविकाने झाली. या प्रदर्शनासाठी काजी, बलदोटा, भागडे, भोसले आणि मोईन काझी यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, विश्वस्त महादेव फंड आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. मेघाली शेटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अनुराधा सुरवसे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *