भव्य रक्तदान शिबिर आणि किर्तन सोहळ्याचे आयोजन
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्याचे वीर सुपुत्र शहिद जवान नवनाथ गात यांच्या २३ व्या स्मृती दिनानिमित पुरस्कार, रक्तदान आणि किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता तालुक्यातील वरकुटे (मुर्तीचे) येथील शहीद जवान नवनाथ गात स्मृतीस्थळ येथे हा कार्यक्रम होणार आहे.

शहिद जवान नवनाथ गात यांच्या स्मृती दिनानिमित्त शहिद जवान नवनाथ गात स्मारक समितीच्या वतीने गेल्या २२ वर्षांपासून सामाजिक, शौर्य, शैक्षणिक, क्रिडा आणि कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. पुरस्कार दिले जाण्याचे यंदा २३ वे वर्ष आहे. सोमवारी असलेल्या या शहीद स्मृतिदिन कार्यक्रमात पुरस्कार सोहळ्यासोबतच भव्य रक्तदान शिबिर आणि सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प.गणेश महाराज बरगे यांचे कीर्तनही होणार आहे.

यावर्षी सामाजिक क्षेत्रातून पुण्याचे उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे, सीमेवर दाखवलेल्या शौर्याबद्दल निवृत्त कॅप्टन (सेना मेडल) रावसाहेब साळुंखे, शैक्षणिक क्षेत्रातून करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील आदलिंग वस्ती जि.प.प्राथ. शाळा, क्रीडा (कुस्ती) क्षेत्रातून कुमार महाराष्ट्र केसरी शिवम आण्णासाहेब ढाणे तर कृषी क्षेत्रातून करमाळा ऑरगॅनिक ग्रुप हे स्मारक समितीच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.

या कार्यक्रमासाठी तालुक्याचे आमदार नारायण पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस अंजना कृष्णा व्ही.एस, तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनोज राऊत, ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल-कोलते, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ, रोपळे (क) येथील श्रीमान लक्ष्मणराव पवार विद्यालयाचे प्राचार्य योगेश दळवे, जि.प. सदस्य आण्णासाहेब ढाणे, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे यांच्यासह कॅप्टन विलास नाईकनवरे, अजित तळेकर, देविदास ताकमोगे, महादेव (बंटी) जाधव, सुनिल सावंत आणि आजी माजी सैनिक उपस्थित राहणार आहेत.

सोमवारी असलेल्या या शहीद स्मृतिदिन कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शाहिद जवान नवनाथ गात स्मारक समितीचे अध्यक्ष नागनाथ गात व सचिव नीलकंठ ताकमोगे यांनी केले आहे.

.

.

