March 1, 2026
IMG-20251210-WA0017

सासरच्यांसह वाशिंबेच्या ननंद आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी – चार चाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी करमाळा पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील राजुरी येथे ही घटना घडली आहे.

याबाबत विवाहितेचे वडील गौतम दशरथ पवार (वय-55 वर्षे, रा. नान्नज ता. जामखेड जि. अहिल्यानगर) यांनी करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी प्रियांका उर्फ जागृती दशरथ साखरे (वय-27 वर्षे, रा. राजुरी ता. करमाळा जि. सोलापूर) हिने तिचे पती दशरथ साखरे, सासु नंदा साखरे, सासरे नामदेव साखरे, नणंद निता संतोष वाळुंजकर व नणंदेचा पती संतोष वाळुंजकर यांनी तिला चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन पैसे घेऊन येण्यासाठी सतत हाताने, लाथाबुक्यांने मारहाण करत तिला घरात राहायचे नाही, असे म्हणून तिला जेवण, पाणी देत नव्हते. सासरच्यांच्या या त्रासाला कंटाळुन प्रियांका उर्फ जागृती हिने दि.09/12/2025 रोजी दुपारी 02/00 वा.चे पुर्वी तिचे सासरच्या राहत्या घरासमोरील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

पवार यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी प्रियंकाचा पती दशरथ, सासू नंदा, सासरा नामदेव साखरे (तिघे रा. राजुरी, ता. करमाळा) आणि ननंद निता व तिचा पती संतोष वाळुंजकर दोघे रा. वाशिंबे, ता. करमाळा. यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 108, 80, 85, 3 (5) व हुंडा प्रतिबंधक अधिनियम कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मयत प्रियंकाचा पती दशरथ याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान मृत प्रियंका यांच्यावर बुधवारी पहाटे दोन वाजता राजुरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रियंकाच्या माहेरच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. प्रियंका हिला पाच वर्षाचा मुलगा असून दीड वर्षाची एक मुलगी आहे. बालवयात ही मुले आईविना पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *