राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड…
करमाळा, प्रतिनिधी – करमाळ्याच्या वीर शिवाजी महाराज तलवारबाजी ग्रुपच्या तीन तरुण खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत चमक दाखवत नॅशनल स्पर्धेसाठी झेप घेतली आहे.

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत शहरातील महात्मा गांधी विद्यालयाच्या श्रुतिका नागनाथ बोळगे हीने १४ वर्षे वयोगटातील इप्पी या प्रकारात तृतीय क्रमांक तर आण्णासाहेब जगताप विद्यालयातील ईश्वरी महेश राऊत हीने १७ वर्षे वयोगटातील इप्पी या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच अजिंक्य लक्ष्मण दळवी याने १९ वर्ष वयोगटातील सेबर या प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

स्पर्धेदरम्यान श्रुतिका आणि ईश्वरी व अजिंक्य यांनी अप्रतिम कौशल्य, एकजूट आणि जिद्दीचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीपासूनच त्यांनी दमदार खेळ दाखवत सलग सामने जिंकले आणि महाराष्ट्रातील पुणे, लातुर, मुंबई, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या आठ विभागातील खेळाडूंना पराभूत करत आपल्या श्रेष्ठतेची छाप उमटवली. या यशामुळे या तिन्ही खेळाडूंची मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांच्या यशामागे सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश काटुळे, सोलापूर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव दिपक शिंदे, पवन भोसले, राहुल मेहत्रे, अक्षय माने, प्रशिक्षक नागनाथ बोळगे, संतोष झिंजाडे, सुरज वायकुळे आणि अभिषेक कुतवळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या खेळाडूंच्या यशामुळे करमाळा तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. राज्यस्तरावरही त्यांच्याकडून भव्य कामगिरीची अपेक्षा शाळांच्या मुख्याध्यापकांसह पालक वर्ग आणि क्रीडा प्रेमींकडून केली जात आहे.

.

.

.

.
.
