वीटमध्ये विहिरीत पडून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत
करमाळा, प्रतिनिधी – तुकाराम बीजेच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान करमाळा तालुक्यातील वीट येथे अतिशय मन हेलावून टाकणारी दुःखद घटना घडली आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेला चिमुकला खेळत-बागडत नजरचुकीने मंदीर परिसरातील विहीरीत पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गुरुवार दि.५ रोजी सकाळी तुकाराम बीज निमित्त वीट येथील रेवणनाथ महाराज मंदिरात किर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी गावातील इतर भाविकांसोबतच समर्थ आनंद भिसले (वय-३ वर्षे) हा आपल्या आजीसह मंदिरात आला होता. कीर्तनानंतर पुष्पांजली वाहण्याच्या कार्यक्रमा दरम्यान मंदिर परिसरात बागडत असलेला समर्थ दिसून न आल्याने आजीने त्याचा शोध घेतला.

मात्र मंदिर परिसरात सर्वत्र शोध घेऊनही समर्थ मिळून न आल्याने ओळखीच्या एखाद्या कोणासोबत तरी गेला असल्याची आशा धरून गावाशी संबंधित समाज माध्यमांवरही त्याचा फोटो आणि वर्णन व्हायरल करण्यात आला. गोंडस चिमुकल्याचा फोटो पाहून प्रत्येकाने त्याचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. एव्हाना याबाबत नातेवाईकांनी पोलिसांना देखील कळवले होते. त्यामुळे करमाळा पोलिसांनीही वीट गावात येऊन समर्थचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सरते शेवटी समर्थ मिळून येत नसल्याने पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी मंदिरा पाठीमागील नागाई नावाच्या विहिरीत डोकावून पाहिले. वापरात नसलेल्या आणि पडीक असलेल्या या विहिरीतील पाण्यावर जमा झालेले शेवाळे एका ठिकाणी बाजूला झाल्याचे दिसल्याने गावातील काही तरुणांनी पाण्यात उतरून पाहिले असता समर्थ या विहिरीच्या पाण्यात बुडालेला दिसून आला. त्याला तात्काळ पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र वेळ निघून गेली होती आणि समर्थ निपचित पडला होता.

विहिरीतील पाण्यात बुडालेला आढळल्यानंतर समर्थ याला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यानंतर समर्थच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून गुरुवारी सायंकाळी वीट येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची करमाळा पोलिसांत नोंद झाली असून करमाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

समर्थ याचे वडील आनंद भिसले हे करमाळ्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करतात तर समर्थचे आजोबा संजय भिसले हे शेती करतात. या दुःखद घटनेमुळे वीट पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

