ग्रामपंचायतीच्या इतर मालमत्तांच्या वापरापोटी भाडे मिळत असल्याचा सरपंच प्रतिनिधीचा निर्वाळा
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील राजुरी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागांवर थाटलेल्या खाजगी व्यवसायांबाबत राजुरी येथील शिवसेना विभाग प्रमुख अजय साखरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे दि.२७/०२/२६ रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीची चौकशी होण्यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयात थाटलेले ग्राहक सेवा केंद्र गुंडाळण्यात आले आहे. असे असले तरी सदर व्यावसायिकाकडून यापूर्वीचे भाडे वसूल करून घेण्यासाठी आग्रही असल्याचे तक्रारदार साखरे यांनी म्हटले आहे.

राजुरी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या इमारत आणि इतर जागांवर खाजगी व्यवसाय सुरू असल्याबाबत साखरे यांनी गट विकास अधिकारी करमाळा यांचे नावे तक्रारी अर्ज दिला होता. या अर्जाच्या चौकशीबाबत विस्तार अधिकारी दास यांना पत्र दिल्याचे तसेच लवकरच या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम सांगितले आहे. या प्रकाराच्या अधिक चौकशी करिता राजुरी सरपंच प्रतिनिधी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला असता तक्रारदार यांनी नमूद केलेल्या ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयातील ग्राहक सेवा केंद्र हटवण्यात आल्याची तसेच ग्रामपंचायतच्या मालकीच्या इतर मालमत्तांचा भाडेपट्टा करार असल्याचे आणि सदर वापरकर्ते ग्रामपंचायतीकडे त्याचे भाडे भरत असल्याचे सांगितले आहे.

ग्रामपंचायतच्या जुन्या कार्यालयातील अतिक्रमण हटवण्यात आले असले तरी सदर अतिक्रमणाचा पंचनामा करून दहा वर्षांचे भाडे वसूल केले जावे तसेच या कृत्याला पाठीशी घालणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी १० मार्च पासून पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे तक्रारदार अजय साखरे यांनी म्हटले आहे.

.

.

.

