करमाळा, प्रतिनिधी – दिवाळीपूर्वी पूर आलेल्या सीने काठच्या पोटेगाव येथील ग्रामस्थांना चक्क हिवाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने विज बिल थकविल्यामुळे फिल्टर आणि बोअर बंद असल्यामुळे ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी पोटेगाव ग्रामपंचायत तर्फे गावातील बोअरवर आरो फिल्टर बसवण्यात आला आहे. हा फिल्टर बसवल्यापासून ग्रामस्थांना ५ रुपयांत २० लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळत होते. याचा हिशोब ग्रामसेवक व सरपंच हे पाहतात. मात्र मागील पंधरा दिवसांपासून वीज बिल न भरल्यामुळे येथील कनेक्शन तोडण्यात आले आहे. पोटेगावात पिण्याच्या पाण्याची इतर कोणतीही सोय नसल्याने ग्रामस्थांना तीन किलोमीटर वरील बोरगाव येथून पाण्याचे जार आणावे लागत आहेत. प्रत्यक्षात ग्रामपंचायतीकडून पाण्यासाठी पैसे घेतले जात असताना वीज बिल थकणे अपेक्षित नाही. विज बिल थकबाकी विषयी संबंधितांकडून कोणत्याही ग्रामसभेत माहिती देण्यात आली नाही. आता ऐनवेळी वीज कनेक्शन तोडण्यात आल्यानंतर याबाबत जाब विचारणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून उडवाउडीची उत्तरे देण्यात येत आहेत.
पोटेगावात राहणाऱ्या ग्रामस्थांची जवळपास ८०० लोकसंख्या आहे. ऊस तोडीचे दिवस असल्याने यामध्ये ऊसतोड कामगारांचीही भर पडलेली आहे. यांतील अनेक जण नदीचे दुषित पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. गावातील एकमेव पिण्याच्या पाण्याचा फिल्टर बंद असल्यामुळे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने लवकरात लवकर विज बिल भरून आर ओ प्लांट त्वरित पूर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अवास्तव वीज बिल येत असल्यामुळे बिल कमी करून मिळावे म्हणून महावितरणकडे अर्ज केला आहे. आज (मंगळवारी) याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून वीज कनेक्शन जोडले जाईल. -सुशेन ननवरे, ग्राम विकास अधिकारी, पोटेगाव.
.