March 1, 2026
IMG-20260224-WA0105

पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील शेटफळ (ना) येथील वैभव वसंतराव पोळ यांच्या नागराज मशिनरी शेती मॉल या फर्मच्या वर्धापन दिनानिमित्त लोकविकास फार्मस् प्रोड्युसर कंपनीच्या वतीने मंगळवार दि. २४ रोजी शेटफळ येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शासकीय अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थितांना शेतीविषयक उपयुक्त मार्गदर्शन केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (IPS), उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, युनियन बैंक क्षेत्रीय कार्यालय, अहिल्यानगरचे क्षेत्र प्रमुख सुनिलकुमार यादव, नवनियुक्त उपविभागीय कृषी अधिकारी प्रतिक्षा शिंदे-कवडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, जैन इरिगेशन सोलापूरचे कृषीतज्ञ किरण पाटील, कंदर येथील के डी एक्सपोर्टचे किरण डोके, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी सोमनाथ हुलगे, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमात ॲड. हिरडे, वाकडे, शिंदे-कवडे, पाटील, डोके, करे पाटील आदींनी आपल्या मनोगतातून उपस्थित शेतकऱ्यांना आपल्या अनुभवासह इच्छित पिकासाठी आवश्यक मशागत, जलसिंचनाचे नियोजन, खते, फुल आणि फळ नियोजन, संभाव्य रोग आणि त्यापासून बचाव करण्याची औषधे, निर्यातक्षम फळांची योग्य प्रतवारी, देश व विदेशातील बाजारपेठा आदींबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी नवनियुक्त पंचायत समिती सदस्या तथा प्रगतिशील महीला शेतकरी सोनाली तकिक यांनी उपस्थित महिला वर्गाला शेतीकामाची सुलभता आणि मजुरांच्या कमतरतेवरील योग्य पर्याय सुचवून शेती कामातील महिलांचे योगदान लक्षात आणून दिले.

यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या हस्ते तालुक्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सौ. सुषमा व संतोष संभाजी चव्हाण, सौ.अश्विनी व श्रीकृष्ण ज्ञानदेव गोडगे, सौ. जयश्री व मल्हारी किसन दुरंदे, सौ. अर्चना व रविंद्र दत्तात्रय देवकर, सौ. नगीना व ब्रम्हदेव चंद्रकांत पोळ, सौ. मनिषा व संतोष चंद्रहार कदम, सौ. छाया व रामदास काशिनाथ बिचितकर, सौ.मनिषा व भारत मुरलीधर आडसुळ, सौ. रूपाली व राहूल तात्याराम मोरे, सौ. उज्ज्वला व बापूराव औदुंबर रोकडे, सौ. चंद्रकला व मधुकर दत्तू मारकड या शेतकरी दाम्पत्यांचा तसेच नवनियुक्त उपविभागीय कृषी अधिकारी प्रतिक्षा शिंदे-कवडे यांचा शाल, फेटा, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच करमाळा तालुका कृषी कार्यालयाच्या वतीनेही शेतीतून भरघोस एकरी उत्पन्न काढलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

लोकविकास फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे गजेंद्र पोळ यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. नंदकिशोर वलटे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कु. जान्हवी वैभव पोळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शेटफळ पंचक्रोशीतील शेतकरी वर्गासह तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते, कृषी सेवा केंद्र चालक आदींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाला महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.

पाण्याची उपलब्धता व जमिनीच्या सुपीकतेला शेतकरी वर्गाच्या कष्टाची जोड असल्याने उजनी पाणलोट क्षेत्रात प्रगतिशील शेती निर्माण होत आहे. या भागातील शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे, खते, बी-बियाणे आदी शेती उपयोगी वस्तू कमी वेळेत आणि खात्रीशीर मिळण्यासाठी शेटफळ येथे नागराज मशिनरी आणि शेती मॉलची तसेच शेतीमाला योग्य दराची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या दृष्टीने लोकविकास फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची निर्मिती करण्यात आली आहे. केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता आम्ही शेतकऱ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करतो.
-वैभव पोळ,
नागराज मशिनरी आणि शेती मॉल,
शेटफळ.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *