March 1, 2026
IMG-20251123-WA0043

नाराज जनता कोणाला तारणार???

करमाळा, विशाल परदेशी – शहरामधील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती आदी कामांचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था असते. यामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवर वरील कामांची जबाबदारी असते. अलीकडील काळात लोकप्रतिनिधींना या जबाबदारीचा विसर पडून नगर पालिका ही संस्था केवळ टक्केवारीचे कुरण असते, असा समज झाला आहे. निवडणुका लागल्यानंतर या संस्थेवर निवडणुकीच्या माध्यमातून वर्चस्व प्राप्त करण्यासाठी पुढाऱ्यांमध्ये चढाओढ दिसून येते आणि सत्तेच्या बेरजेत नागरिकांच्या समस्यांचा मात्र त्यांना विसर पडतो.

पूर्वीच्या काळात विकास कामे क्वचितच येत असली तरी आलेली कामे प्रामाणिकपणे करून ती जनतेला सोपविण्यात येत असत. अंदाजपत्रकात काय नमूद केले आहे, यापेक्षा काम दीर्घकाळ कसे टिकेल याचा विचार करून शहरातील पाईपलाईन, रस्ते, गटारी, बांधकामे होत. मात्र अलीकडे ही कार्यपद्धती लोप पावली असून जास्तीत जास्त कामे आणून त्यातील मलिदा खाऊन केवळ विकास कामाचा बोर्ड लावण्या इतपत काम करणाऱ्यांची साखळी झाल्याचे निदर्शनास येते. एवढ्यावरच न थांबता दर्जाहीन केलेली कामे अल्पावधीतच खराब होऊन जातात आणि मग पुन्हा तिच कामे नव्याने निधी वापरून केली जातात. शहरातील सोशिक जनता मात्र विस्कळीत पाणीपुरवठा, खराब रस्त्यांमुळे उडणारी धूळ, अनियमित स्वच्छतेमुळे होणारी दुर्गंधी आणि रोगराई यांचा निमुटपणे सामना करते.

चार वर्षांपासून नगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक आहे. मात्र त्यापूर्वीही आणि नंतरही नगरपालिकेच्या कारभारात सुधारणे ऐवजी विस्कळीत पणाच दिसून आलेला आहे. आता करमाळा नगरपरिषदेची निवडणूक लागली असताना पालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जो तो येनकेन प्रयत्न करताना दिसत आहे. जनतेच्या प्रश्नांचा पुढाऱ्यांना विसर पडला असला तरी आतापर्यंत हाल सोसलेल्या जनतेच्या मनातील खदखद आणि नाराजी मतांच्या रूपात प्रकटणार असून भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे भवितव्य हीच सामान्य जनता ठरवणार आहे, हे मात्र नक्की…!!!

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *