March 1, 2026
IMG-20251228-WA0108

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील जातेगाव येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत कोल्हा पडल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली आहे. या कोल्ह्याला स्थानिकांसह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असला तरी रविवारी सायंकाळपर्यंत त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले असून सदर कोल्ह्याला रविवारची रात्र विहिरीतच काढावी लागणार आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की जातेगाव येथील सुनील जगताप यांना त्यांच्या शेतातील पायऱ्या नसलेल्या खोल विहिरीत कोल्हा पडल्याचे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास निदर्शनास आले. यावेळी जगताप यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जातेगाव शाखाप्रमुख अशोक लवंगारे यांच्यासह इतरांच्या मदतीने सदर कोल्ह्याला विहिरीतून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल घुमरे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वन विभागाचे कर्मचारी गणपत जाधव आणि दीपक कदम यांनीही रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत सदर कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. परंतु या कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी पुरेशा साधनांच्या अभावामुळे विहिरीत पडलेला कोल्हा काढण्यात त्यांना अपयश आले आहे.

दरम्यान याबाबत वन विभागाच्या अधिकारी श्रीमती शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उद्या (सोमवारी) सकाळी मोहोळ येथून वन विभागाचे वाहन पाठवून सदर कोल्ह्याची सुटका केली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला रविवारची रात्र विहिरीच्या बाजूला जेमतेम असलेल्या कपारीवरच थंडीत कुडकुडत काढावी लागणार आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *