करमाळा, प्रतिनिधी – करमाळा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी गुरुवार दि.१२ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज राहिल्यामुळे निवडणूक अध्याशी अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी सभापती पदी वीट गणातून निवडून आलेल्या भाजपाच्या पूजा सचिन ढेरे आणि उपसभापतीपदी केतुर गणातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. अजिनाथ विघ्ने यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

करमाळा तहसील कार्यालय आवारातील पंचायत समिती सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकालानंतर सुरुवातीला सभापती व उपसभापती पदासाठी अनेक इच्छुकांनी दावे केले होते. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती करून ही निवडणूक लढवली होती तर विद्यमान आमदार पाटील यांनी करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली होती. जिल्हा परिषदेच्या ६ आणि पंचायत समितीच्या १२ अशा जागांसाठी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आणि करमाळा तालुका विकास आघाडी यांचे समसमान म्हणजे जिल्हा परिषदेसाठी प्रत्येकी दोन तर पंचायत समिती साठी प्रत्येकी चार उमेदवार निवडून आले होते. करमाळा पंचायत समिती सभापतीपद इतर मागासवर्गीय महिला साठी आरक्षित होते. करमाळा पंचायत समितीच्या १२ गणांपैकी उमरड व वीट हे दोन गण ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होते. या जागांवर वीट गणातून भाजपाच्या पूजा ढेरे तर उमरड गणातून आ. पाटील गटाच्या माजी सभापती अतुल पाटील यांच्या अर्धांगिनी अदिती पाटील या निवडून आल्या होत्या. भाजपा राष्ट्रवादी युती असल्याने सभापती पद बिनविरोध होणार अशी सुरुवातीपासूनच चर्चा होती मात्र सभापती पदाच्या ऐन निवडणुकी दिवशी आदिती पाटील यांनीही सभापती पदासाठी आपला अर्ज दाखल केला होता. उपसभापती पदासाठी ॲड. विघ्ने यांचा एकमेव अर्ज दाखल होता. छाननी नंतर हे तीनही अर्ज वैध ठरले होते. दरम्यानच्या कालावधीत पडद्यामागून काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि सौ. पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि निवडणूक अध्याशी अधिकारी कसेकर यांनी सभापती पदी ढेरे आणि उपसभापती पदी विघ्ने यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

निवडीनंतर करमाळा पंचायत समिती तर्फे नुतन सभापती, उपसभापती आणि सर्व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभागृहाबाहेरून हलगीच्या कडकडाटात, गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी नूतन सभापती आणि उपसभापती यांना त्यांच्या दालनाकडे नेण्यात आले. या निवडणुकीसाठी सचिव म्हणून काम पाहिलेल्या गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांच्या हस्ते सभापती आणि उपसभापती पदाचा पदभार नुतन पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आला.

यावेळी दिवंगत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिगंबर बागल यांच्यासह दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार आणि माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रतिमा सभापतींच्या दालनात लावण्यात आले. भाजपाचे दिग्विजय बागल, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांनी या प्रतिमांचे पूजन केले.

यावेळी सभापती पूजा ढेरे आणि उपसभापती अजिनाथ विघ्ने यांनी मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ करणार असल्याचे तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शी कारभार करून खोळंबलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी जोमाने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

.

