करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील आवाटी येथील हजरत चांद पाशा (वली बाबा) दर्गाह मध्ये उद्या (सोमवार) पानीपत येथील हजरत बु अलीशाह कलंदर रह. यांच्या स्मरणार्थ उर्स कलंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दर्गाह कमिटीचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी यांनी दिली आहे.

याबाबत अधिक बोलताना त्यांनी सांगितले आहे की, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले हजरत वली चांद पाशा दर्गाहवर विविध धर्माचे भाविक मोठ्या संख्येने येतात. दर्गाहावर वर्षभरातून तीन धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहमय वातावरणात साजरे केले जातात. उद्या असलेल्या ऊर्सच्या निमित्ताने दर्गाह वर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ९ वाजेपर्यंत बु अलीशाह कलंदर यांची गिलाफ चादर दर्शनासाठी राहणार आहे. याशिवाय संध्याकाळी ईशा नमाज नंतर महफिले समाचा कार्यक्रम होणार आहे. दर्गाह वर आलेल्या भक्तांना ट्रस्टच्या वतीने महाप्रसाद लंगर खाना वाटप राहणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दर्गाहवर विविध रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सदर धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भक्तगणांनी घ्यावा, असे आवाहन दर्गाह कमिटीचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी, बाबाचे खादिम गुलाम नबी कादरी तसेच आवाटी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

.

.

.

.

