April 12, 2026
IMG-20260330-WA0027

करमाळ्यात चौघांनी वृद्धेला घातला लाखोंचा गंडा

करमाळा, प्रतिनिधी – पोलीस असल्याचे सांगून अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवण्यास भाग पाडून चौघांनी वृद्ध महिलेची पर्सच पळवून नेली आहे. मंगळवार दि.२४/०३/२६ रोजी करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावरील देवीचा माळ लगतच्या टांगडे मळा येथे हा प्रकार घडला आहे.

याबाबत कौसल्या मोहनराव शेलार (वय-६८ वर्षे, रा. गणेशनगर, करमाळा) यांनी दि. २५/०३/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत अधिक म्हटले आहे की, दि.२४/०३/२६ रोजी त्या करमाळा येथील आय. सी.आय.सी.आय. बँके जवळुन नातेवाईकाच्या चार चाकी टमटम मध्ये बसून पांडे रोडने घोटीकडे चालल्या होत्या. यावेळी दुपारी १:३०च्या सुमारास देवीच्या माळाच्या पुढे गेल्यावर टांगडे मळा येथे दोन दुचाकींवरून डबल सीट बसून आलेल्या चौघांनी चालकास टमटम थांबविण्यास सांगितले व पोलीस असल्याची बतावणी करत आणि एका महिलेला चाकूचा दाखवून लुटले गेले असल्याचे सांगत शेलार यांना त्यांचे दागिने काढून पर्समध्ये ठेवण्यास सांगितले. यानंतर या चौघांनी चेकिंग चालू असल्याचे सांगत तुमच्याकडे गांजा आहे का असे म्हणत टमटम तपासण्याच्या बहाण्याने शेलार यांची दागिने असलेली पर्स अचानक उचलून घेऊन मोटारसायकलींवर करमाळ्याच्या दिशेने निघून गेले.

या घटनेत चोरट्यांनी शेलार यांच्या हातातील प्रत्येकी दीड तोळा वजनाच्या २,७०,००० रु. किंमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या, अडीच तोळा वजनाची २,२५,००० रु. किमतीची एक पाटली, काळे मणी असलेले एक तोळा वजनाचे ९०,००० रु. किंमतीचे मिनी गंठण असा एकुण ५,८५,००० रुपये किमतीचा ऐवज पळवून नेला आहे.

शेलार यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक पी. बी. टिळेकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *