April 12, 2026
IMG-20260330-WA0061

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगरपालिकेवर स्थानिक विकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर शहरातील विविध विकास कामांसाठी निधीबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. याबाबत नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी सोमवार दि.३० रोजी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून करमाळा नगरपालिकेला विविध विकास कामांसाठी विविध योजनांतून भरघोस निधी मिळाला असल्याची माहिती दिली आहे.

याबाबत सविस्तर बोलताना नगराध्यक्षा सावंत यांनी सांगितले की, करमाळा नगरपालिकेचा कारभार हातात घेतल्यानंतर शहरातील विविध प्रलंबित विकास कामांच्या निधीसाठी स्वत: नगराध्यक्षा सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड आणि सर्व नगरसेवक प्रयत्नशील होते. याबाबत सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे शहरातील समस्या मांडून या समस्यांचे निराकारणासाठी निधीची मागणी केली होती. या सर्वांच्या पाठपुराव्याला अल्पावधीतच यश आले असून पालकमंत्री ना. गोरे यांच्या विशेष सहकार्याने करमाळा शहरातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी प्राप्त झालेला आहे. यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियाना अंतर्गत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसर सुशोभिकरण, संगम चौक ते महात्मा गांधी पुतळा रस्ता डांबरीकरण, शहरातील चांदगुडे गल्ली येथील विविध रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी आणि चांदगुडे गल्ली येथील विविध गटार बांधकाम करण्यासाठी तसेच प्रभाग क्र.१ मध्ये दहा सीट शौचालय बांधण्यासाठी असा एकूण ३ कोटी तीन लाख एकोणीस हजार आठशे ब्याऐंशी तर
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजने अंतर्गत प्रभाग क्र.१० (मौलाली माळ) भागामध्ये विविध ठिकाणी गटार बांधकाम, स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी शौचालय बांधणे या कामांसाठी एक कोटी एकवीस लाख ९६ हजार ८८८ असा एकूण रू.४,२५,१६,७७०/- (चार कोटी पंचवीस लाख सोळा हजार सातशे सत्तर रूपये) एवढा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंजूर केलेला आहे.

तसेच ‘नमो उदयान’ करीता एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीच्या माध्यमातून कृष्णाजी नगर येथे उद्यान उभा करणार असल्याचे तसेच हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान योजनेअंतर्गत शिक्षण व आरोग्याकरिता प्रत्येकी ५० लाख निधी मंजूर झाला असल्याचेही नगराध्यक्षा सावंत यांनी सांगितले आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *