करमाळा, प्रतिनिधी – ग्रामीण भागातील यात्रांमध्ये लोककलेच्या नावाखाली अलीकडील काळात बीभत्सपणा प्रकर्षाने दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील झरे गावातील यात्रेमध्ये अश्लील कार्यक्रम व ध्वनीप्रदूषणास तात्काळ बंदी घालून कायदेशीर कारवाई करण्याबाबत ग्रामस्थांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (आय.पी.एस.) अंजना कृष्णा व्ही.एस. यांना निवेदन दिले आहे.
याबाबत झरे गावातील महिला पुरुष ग्रामस्थांनी एकत्र येत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झरे येथे गुरुवार दि. २ एप्रिल होणारी जोतिबा यात्रा ही धार्मिक व पारंपरिक स्वरूपाची असून गावाच्या श्रद्धेचा अत्यंत संवेदनशील विषय आहे. मात्र मागील काही वर्षांपासून या यात्रेमध्ये सार्वजनिक ठिकाणी डीजे वर ध्वनी प्रदूषण करत उघडपणे अश्लील गाणी व नृत्य आयोजित केले जात आहेत. हे समाजातील नैतिक मूल्ये, महिलांचा सन्मान व सार्वजनिक शिस्त यांना बाधा आणणारे आहेत. डीजेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्रास सहन करावा लागतो. हे प्रकार भारतीय दंड संहिता तसेच ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणारे असून, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे आहेत.
त्यामुळे अश्लील गाणी व नृत्याच्या कार्यक्रमांना तात्काळ परवानगी नाकारुन अशा कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, डीजेच्या ध्वनीप्रदूषणावर कायदेशीर मयदेिनुसार कडक नियंत्रण ठेवण्यात यावे आणि यात्रेदरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्याकडे केली आहे.
जवळपास दीडशे ग्रामस्थांच्या सहिनिशी दिलेल्या या निवेदनाच्या प्रती करमाळा तहसिलदार , करमाळा पोलिस निरीक्षक आणि महिला व बालविकास अधिकारी (करमाळा) यांना देण्यात आलेल्या आहेत. सर्वाधिक महिला सदस्य आणि महिला सरपंच असणाऱ्या झरे गावात मागील काही वर्षांपासून यात्रेतील अश्लील नृत्य आणि डीजेला सर्वंकश विरोध होत आहे. महिला प्रधान असलेला ग्रामपंचायतचा कारभार पुरोगामी असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध विकास कामे झालेली असून होतही आहेत. मात्र काही मोजक्या अपप्रवृत्तीमुळे गावातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रशासनाने योग्य कारवाई करणे अपेक्षित आहे. -मंजुश्री मुसळे, सरपंच (प्रशासक) झरे, ता. करमाळा. ग्रामदेवतेच्या यात्रेत धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणे गरजेचे असताना अलीकडील काळात झरेगावातील ज्योतिबा यात्रेमध्ये नृत्यांगना आणून आणि डीजे लावून बीभत्स नृत्याचे कार्यक्रम होतात. अशा कार्यक्रमांमुळे झरे गावासह पंचक्रोशीतील तरुण पिढी बिघडत चालली असून अशा कार्यक्रमांत बक्षिसाच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक अपव्ययामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांना झरे गावातील महिलांसह अनेक संस्कृत पुरुषांचाही कडाडून विरोध आहे. हा विरोध लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित पाऊले उचलणे गरजेचे आहेत. – सोमनाथ जाधव, तालुका उपप्रमुख, प्रहार शेतकरी संघटना, झरे, ता.करमाळा. झरे ग्रामस्थांचे निवेदन प्राप्त झाले असून ग्रामस्थांसह यात्रा कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. संबंधितांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. -अंजना कृष्णा व्ही.एस.