April 11, 2026
IMG-20260401-WA0032(1)

महावितरणच्या तंत्रज्ञाला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

करमाळा, प्रतिनिधी – विज बिल वसुली दरम्यान वीज चोरी निदर्शनास आल्यानंतर त्याचे फोटो काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवल्यामुळे तसेच फोटो काढल्याचा राग धरून शासकीय कर्मचाऱ्यांस शिवीगाळ दमदाटी आणि मारहाण केल्याप्रकरणी करमाळा पोलीसांत शहरातील दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत करमाळा महावितरण शाखेचे वरीष्ठ तंत्रज्ञ जावेद इन्नुस शेख (वय-३८ वर्षे) यांनी दि.३१/०३/२६ रोजी करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.३१ रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास ते विरेंद्र सुभाष लष्कर यांच्यासह वीज बील वसुलीसाठी करमाळा शहरातील पुणे रोड येथील भारत भीकु माने यांच्याकडे गेले होते. यावेळी वीज बिल थकीत असल्याने वीज कनेक्शन तोडलेल्या घरातील पंखे व लाईट चालू दिसल्यामुळे जावेद शेख यांनी मीटर व वायरचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता भारत भीकु माने व त्यांच्या सोबत असणाऱ्या दोन महिलांनी त्यांना फोटो घेण्यापासून अटकाव करून शासकीय कामात अडथळा आणला. तसेच वीज चोरीचे फोटो काढल्याचा राग मनात धरून स्वप्निल भारत माने याने फोनद्वारे तसेच जीन मैदान येथे समक्ष व वीज वितरण कार्यालय, करमाळा येथेही येऊन जावेद शेख यांना शिवीगाळ, दमदाटी करुन हाताने मारहाण केली. दरम्यान स्वप्निल हा तेथील सीमेंटचा ब्लॉक हातात घेऊन जावेद शेख यांना मारण्याच्या प्रयत्नात असताना महावितरण कार्यालयातील वायरमन अर्षद शेख हे मध्ये आल्याने त्यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर सिमेंटचा ब्लॉक लागुन त्यांना जखमी केले आहे.

जावेद शेख यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी स्वप्निल भारत माने, भारत भिकु माने, व अनोळखी दोन महिला (सर्व रा. पुणे रोड, करमाळा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पो.हे.कॉ. अभिजीत मोहोळकर हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *