करमाळा, प्रतिनिधी – शहरालगत असलेल्या गुळसडी रस्त्यावरील शिर्के वस्ती येथील कडब्याच्या आठ गंजींना बुधवारी दुपारी मोठी आग लागली. या आगीत शहरात पशुपालनाचा व्यवसाय करणाऱ्या मारडकर आणि बरीदे यांचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
करमाळा शहरातील मारडकर कुटुंबाची गुळसडी रस्त्यावरील शिर्के वस्ती येथे शेती आहे. जिरायत शेतीतून येणाऱ्या जेमतेम कडब्यावर त्यांच्याकडील जनावरांची गरज भागत नसल्याने बाजारात नवीन कडबा आल्याने त्यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या कडवब्याच्या लिलावातून कडबा विकत घेतला होता. बुधवारी सकाळपासून हा विकत घेतलेला कडबा मारडकर आणि बरीदे कुटुंबातील युवक या कडब्याच्या गंजी रचत होते. दुपारी उन्हाचा चटका जाणवू लागल्याने साडेबारा एकच्या सुमारास गंजी रचण्याचे काम थांबवून हे युवक जेवणासाठी शहरातील घरी आले होते. दरम्यान भर दुपारी या कडब्याच्या गंजींना मोठी आग लागल्याचे शेजारील वस्तीवरील शिर्के यांच्या निदर्शनास आले.
यावेळी शिर्के यांनी ताबडतोब जेवणासाठी शहरात आलेल्या युवकांना याची माहिती देत वस्तीवर असलेल्या हौदातून पाणी उपसून गुळसडी येथील काही युवकांच्या मदतीने आग विझवण्यास सुरुवात केली. यावेळी पांडे ओढा लगत असलेल्या शेतीत काम करत असलेले करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक विक्रम परदेशी, त्यांचे बंधू अमोल परदेशी, चरणसिंग परदेशी, विश्वजीत परदेशी यांनीही आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून घटनास्थळी धाव घेतली. आगीचे रौद्र रूप पाहून अमोल परदेशी यांनी ताबडतोब करमाळा नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेसह शहरातील वार्ड क्रमांक पाच येथील युवकांनाही मदतीसाठी पाचारण केले. अग्निशामक बंब येण्यापूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता असलेल्या इतर कडब्याच्या गंजी या युवकांनी उन्हाची परवाना करता हटवल्यामुळे काही प्रमाणात कडबा वाचवता आला.
या घटनेची माहिती मिळताच करमाळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अतुल फंड यांनीही शिर्के वस्ती येथे उपस्थित राहून तहसील कार्यालयाशी संपर्क साधून या नुकसानीची माहिती दिली. करमाळा तहसीलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे. अग्निशमन वाहनाच्या तीन फेऱ्या झाल्या तरीही ही आग बुधवारी सायंकाळपर्यंत धुमसत होती. या आगीत सुनील मारडकर, नारायण मारडकर, सुभाष मारडकर, किशोर बरीदे या पशुपालकांचा जवळपास पाच लाख रुपये किमतीचा कडबा जळून खाक झाला आहे. जेमतेम असलेल्या शेतीतून आलेला कडबा पुरेसा नसल्याने हे दूध व्यवसायिक कडबा विकत घेऊन ठेवतात. अचानकपणे उद्भवलेल्या या संकटामुळे या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने झालेल्या नुकसानीची दखल घेऊन योग्य प्रमाणात मदत मिळावी अशी अपेक्षा मारडकर आणि बरीदे यांनी केली आहे.
.
.