करमाळा प्रतिनिधी – करमाळा शहरातील सात विहीरीत मंगळवारी सकाळी एकाने उडी मारून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या युवकाने उडी मारताना दुसऱ्या एका जणाने पाहिलेले असल्याने मंगळवारी दिवसभर या युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत सदर युवकाचा शोध लागला नाही.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी सकाळी करमाळा नगरपालिकेचे एक-दोन सफाई कर्मचारी प्रशस्त असलेल्या सात विहिरीच्या बाजूला असलेल्या हौदाजवळ उपस्थित होते. यावेळी जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या कठड्यावरून अज्ञात युवकाने विहिरीत उडी घेतल्याचे यांपैकी एकाच्या लक्षात आले. या कर्मचाऱ्याने उडी मारलेल्या युवकाला वाचवण्यासाठी धावही घेतली, मात्र त्या प्रयत्नांना यश आले नाही.
दरम्यान या कर्मचाऱ्याला सदर युवक शहरातील मोहल्ला गल्ली येथील असल्याचा अंदाज आला. या अंदाजावरून त्याने मोहल्ल्यातील युवकांना याबाबत माहिती दिली. यावेळी मोहल्ला गल्ली येथे राहणारा समीर हकीम शेख हा घरातून रागाने निघून गेला असल्याने त्याच्या कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी या कर्मचाऱ्यास उडी मारलेल्या युवकाचे वर्णन विचारले असता कर्मचाऱ्यांनी सांगितलेले वर्णन आणि शर्टाचा रंग या गोष्टींमध्ये साम्य असलेल्या अंदाजावरून उडी मारलेला युवक हा समीर नसू नये, या आशेपोटी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो मिळून आल्याने समीरच्या कुटुंबीयांनी दुपारी बारा वाजता करमाळा पोलिसांना याबाबत खबर दिली.
यानंतर करमाळा पोलीस ठाण्याच्या सहा.पो.नि. गिरीजा मस्के, पोलीस हवालदार जोतीराम बाळसराफ, करमाळा नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक विपुल पुजारी आणि इतर कर्मचारी तसेच मोहल्ला गल्लीतील युवकांकडून मंगळवारी दिवसभरासह सायंकाळी उशिरा पर्यंत उजेडाची सोय करून सात विहिरीत मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. मात्र उडी मारलेल्या युवकाचा मृतदेह आढळला नव्हता. नगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या या धोकादायक विहिरीत अलीकडील काळात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून करमाळा नगरपालिकेने या विहिरी भोवती मजबूत कुंपण करणे गरजेचे आहे. -अशपाक जमादार, सामाजिक कार्यकर्ते, करमाळा.
.
.