April 11, 2026
IMG-20260408-WA0014

पैठणच्या पथकाने काढला मृतदेह

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील मोहल्ला गल्ली येथील समीर हकीम शेख याने मंगळवारी सकाळी सात विहीरीत उडी मारून आत्महत्या केली होती. यानंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही त्याचा मृतदेह हाती न लागल्याने पैठण जवळील एकनाथ अंडरवाटर सर्विसेसच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने बुधवारी सकाळी समीरचा मृतदेह शोधून काढला आहे.

समीरने विहिरीत उडी घेतल्याचे कळाल्यानंतर करमाळा नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच करमाळा पोलिस आणि मोहल्ला गल्लीतील युवकांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत समीरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याचा मृतदेह हाती न लागल्याने समीरचे नातेवाईक व मित्रपरिवाराने पैठण जवळील एकनाथ अंडरवाटर सर्विसेसच्या पथकाला पाचारण केले होते. मंगळवारी रात्री करमाळ्यात पोहोचलेल्या या पथकाने बुधवारची सकाळ उजाडताच सात विहिरीत शोध घेऊन समीरचा मृतदेह अवघ्या १६ मिनिटांत शोधून काढला आहे.

शोध पथकाने मृतदेह विहिरीतून बाहेर काढताच समीरचा भाऊ शकिल आणि मित्रपरिवाराने मोठा आक्रोश केला. मृतदेहाला ताबडतोब करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. सध्या शवविच्छेदनाचे काम सुरू असून शवविच्छेदनानंतर आज दुपारी दीड वाजता शहरातील आनंद बागेतील मुस्लिम दफन भूमीत समीरवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शोध कार्यात पैठणच्या एकनाथ अंडरवाटर सर्विसेस पथकाची निरपेक्ष मदत
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत समीरचा मृतदेह मिळून येत नसल्याने कुशल बचाव पथकाची गरज लक्षात घेत समीरचे नातेवाईक व मित्रपरिवाराने पैठण जवळील हर्शी या गावातील एकनाथ अंडरवाटर सर्विसेसशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने करमाळ्याकडे धाव घेतली. या पथकातील एकनाथ वाघ, अर्जुन घायाळ आणि परमेश्वर वाघ यांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करून बुधवारी सकाळी अवघ्या १६ मिनिटांत समीरचा मृतदेह विहिरी बाहेर काढला.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *