May 6, 2026
IMG-20260118-WA0018(1)

गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील सुवर्णकार असलेल्या व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या तरुणावर अगोदर कामाला असलेल्या तरुणाने चाकूहल्ला केला आहे. शुक्रवारच्या आठवडी बाजारात भर गर्दीत हा प्रकार घडला आहे.

या घटनेतील जखमी ऋषीकेश रवींद्र अडसुळ (वय-३२ वर्षे, रा. भोसे ता. करमाळा) याने याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १७/०४/२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास करमाळा शहरातील भाजी मंडई परिसरातील जगदंबा मटन शॉप समोर ओंकार प्रकाश कांबळे (वय-२१ वर्षे, रा. उसंत निवास, खडकपुरा गल्ली करमाळा) याने त्याला सोनी ज्वेलर्स या दुकानातून दुकान मालकाने कामावरून काढून टाकल्यानंतर त्या ठिकाणी फिर्यादी ऋषिकेश हा कामावर रुजु झाल्याचा राग मनात धरून फिर्यादी ऋषिकेशच्या उजव्या खांद्यावर चाकू मारून त्याला जखमी केले.

ऋषिकेश रवींद्र अडसूळ च्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी ओंकार प्रकाश कांबळे (वय-२१ वर्षे, रा. उसंत निवास, खडकपुरा गल्ली करमाळा) याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल केला असून पो.हे.कॉ. जोतीराम बाळसराफ हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

करमाळा पोलिसांकडून अवघ्या अर्ध्या तासात हल्लेखोराचा शोध

चाकू हल्ल्याची माहिती मिळतच करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी पो.हे.कॉ. अजित उबाळे, पो. ह. जोतिराम बाळसराफ आणि पो.ह. बापूसाहेब कोकाटे यांना आरोपीच्या शोधार्थ पाठवले. पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही च्या माध्यमातून या तिघांनी सदर आरोपीला ओळखून अवघ्या अर्ध्या तासात त्याला ताब्यात घेतले.

हल्लेखोर मनोरुग्ण

हल्लेखोर ओंकारला पकडून पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याच्या आईने ओंकार हा मनोरुग्ण असल्याचे तसेच त्याच्यावर अहिल्यानगर येथील मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे.

करमाळा पोलिसांचे नागरिकांना तपास कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन

भर बाजारात आणि भर गर्दीत चाकू हल्ल्याचा प्रकार घडल्यानंतर करमाळा पोलीस घटनास्थळी जाऊन चौकशी करत असताना घटनास्थळावरील दुकानदार तसेच बाजारात भाजीपाला, कपडे आदी वस्तूंची दुकाने लावलेल्या व्यापाऱ्यांकडे हल्लेखोरा बाबत माहिती विचारली असता या व्यावसायिकांनी पोलिसांना माहिती देण्याचे टाळले. गुन्ह्याच्या घटनांमध्ये नागरिकांनी शोधकार्यात मदत करणे अपेक्षित आहे, माहिती देणाऱ्या व्यक्तींना पोलिसांकडून कोणताही त्रास अथवा कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागत नाही. त्यामुळे नागरिकांनी विविध गुन्ह्यांबाबतची स्वतःकडील माहिती कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना देऊन सहकार्य करावे.
-रणजीत माने,
पोलीस निरीक्षक, करमाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!