May 6, 2026
IMG-20260118-WA0018(1)

बहिणीसह भाऊजी अटकेत

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील केम येथे शेतात आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा करमाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला असून, या खून प्रकरणी मयताच्या बहिणीसह तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी सांगितले आहे की, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी केम येथील दत्तात्रय देवकर यांची शेती गट नं. ५२७ मधील विहिरीजवळ मक्याच्या गंजीच्या आडोशाला मल्हारी पोपट कांबळे (वय-३८, रा.केम, ता.करमाळा) याचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत करमाळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.

शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट

सुरुवातीला अकस्मात मृत्युची नोंद झाल्यानंतर मल्हारी च्या शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा आवळून मृत्यू झाल्याचे दिसून आले. यानंतर स.पो.नि. टिळेकर यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगाने तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी गुन्हे अन्वेषण पथकासह घटनास्थळी तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी मयताची बहिण शीतल व भाऊजी राजेश यांच्या भावभाव व हालचालीवर पो.नि. माने यांना संशय आला. त्यांच्याकडे कसून तपास केला असता शीतलने गुन्ह्याची कबुली दिली.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पतीची मदत

मृत मल्हारी कांबळे हा दारूच्या नशेत नेहमी भांडण करत असल्याने त्रस्त झालेल्या शीतल हिने ११ एप्रिल रोजी ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर पती राजेश यांच्या मदतीने मृतदेह शेतात नेऊन टाकल्याचे उघड झाले.

या प्रकरणी शीतल राजेश केंगार (वय ३२) व राजेश बापू केंगार (वय ३०, दोघे रा. केम, ता. करमाळा) यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने करत आहेत.

दारू पिण्याचे व्यसन असल्याने जवळच्याच नातेवाईकांनी कोणावरही संशय नसल्याचे सांगितले

मल्हारीचा मृतदेह आढळून आल्यानंतर स.पो.नि. पोपट टिळेकर यांनी मयताची बहीण शीतल केंगार, भाऊजी राजेश केंगार व पोपट यंका कांबळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मयतास दारू पिण्याचे व्यसन असल्याचे सांगून त्याच्या मृत्युबाबत कोणावरही संशय नसल्याचे सांगितले होते.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. पोपट टिळेकर, श्रेणी पो.स.इ. जाधव, पो.हे.कॉ.अजित उबाळे, आप्पा लोहार, महेश डोंगरे, भाऊराव शेळके, पो.ना. मनिष पवार, वैभव ठेंगल, पो.कॉ. अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, अमोल रंदिल यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!