आगळावेगळा संदेश देणारा शिवविवाह
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील कुंभेज फाटा येथे पार पडलेल्या अनोख्या विवाहाची सर्वत्र चर्चा होत आहे. जेऊर येथील निर्मळ आणि कुंभेज येथील भोसले परिवारात नुकताच हा विवाह पार पडला असून या विवाहातील सर्व विधी शिवधर्म पद्धतीने पार पडले आहेत.

जेऊर येथील शिवमती पुष्पा व शिवश्री बाळकृष्ण राजाराम निर्मळ यांचे द्वितीय चिरंजीव शिवमान अतुल आणि कुंभेज येथील शिवमती अनिता व शिवश्री प्रमोद दादासाहेब भोसले यांची ज्येष्ठ कन्या शिवकन्या हर्षदा यांचा विवाह शिवधर्म पद्धतीने संपन्न झाला आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेच्या पूजनाने या विवाहाची सुरुवात झाली. यानंतर वधू-वरांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज, राष्ट्रसंत तुकाराम महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, स्वामी विवेकानंद, संत कबीर, संत रोहिदास, राष्ट्रसंत गाडगेबाबा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील, तथागत गौतम बुद्ध अशा विविध महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यासोबतच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

या विवाह सोहळ्यात उपस्थितांना निर्मळ परिवाराकडून “शिवराय संस्कार आणि शिक्षण” या पुस्तकाच्या तब्बल २००० प्रतींचे वाटप करण्यात आले. पारंपरिक मंगलाष्टकांऐवजी शिव सप्तके सादर करण्यात आली आणि तांदळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यात आले. विवाह मंचावर वरील सर्व महापुरुषांच्या प्रतिमा व त्यांचे ब्रीदवाक्य असलेले फोटो लावण्यात आले होते.

या सोहळ्याला मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड तसेच सकल मराठा समाज करमाळा तालुका येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा शिवविवाह केवळ विवाह सोहळा न राहता सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक मूल्यांचा संदेश देणारा एक आगळावेगळा उपक्रम ठरला आहे.

शिवधर्म पद्धतीच्या विवाहाचे अनुकरण ही काळाची गरज
शिवधर्म पद्धतीचा विवाह हा एक पवित्र, सामाजिक आणि सांस्कृतिक बंधनाचा शिवसंस्कार आहे. हा सोहळा स्त्री-पुरुषांना शारीरिक बंधनात बांधण्यापेक्षा, सामाजिक जबाबदाऱ्या, समानता आणि परस्परांप्रती आदर (शिव-शक्ती स्वरूप) या तत्त्वांवर आधारित असतो. यात बडेजाव न करता साधेपणा, समता आणि शिवविचार प्रधान असतात. त्यामुळे कोणताही बडेजाव न करता छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांवर आधारित शिवधर्म पद्धतीने विवाह करणे ही काळाची गरज आहे.
-नितीन खटके,
पुणे विभागीय कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.
