करमाळा, प्रतिनिधी – रविवार दि.१० रोजी शहरात श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या भव्य विवाह सोहळ्यात तब्बल २५ जोडपी विवाहबंधनात अडकली.

या भव्य विवाह सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहाजीभाऊ पवार, अविनाश महागावकर, चेतनसिंह केदार, भाजपा नेत्या रश्मीदीदी बागल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक लग्न सोहळा आयोजित करण्याचे हे चौथे वर्ष आहे. या विवाह सोहळ्याने करमाळा तालुक्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सर्वधर्मीय समाजाला एकत्र आणत सामाजिक समतेचा संदेश देणारा हा सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नववधू-वरांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महसूल मंत्री बावनकुळे यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे सांगितले. पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांनीही सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे नमूद करत गणेश चिवटे यांचे कौतुक केले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी विवाह सोहळ्यास उपस्थित राहत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. त्यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांना आपला कायम पाठिंबा राहील असे सांगितले.

विवाह सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी तालुक्यातील नागरिक व वऱ्हाडी मंडळी आणि विविध समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गरजू कुटुंबांच्या आयुष्यात आनंद निर्माण करत समाजातील ऐक्य अधिक दृढ करणारा श्रीराम प्रतिष्ठानचा हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा करमाळा तालुक्यात सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.

श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे चौथे वर्ष होते, आजपर्यंत प्रतिष्ठानच्या वतीने 79 विवाह लावण्यात आले होते या वर्षी प्रतिष्ठानने 100 री पार करत 105 विवाह यशस्वी संपन्न केले आहेत. याचे सर्व नियोजन हे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते या सोहळ्यात श्रीराम प्रतिष्ठान आणि राशीन पेठ तरुण सेवा मंडळासह शहरातील सर्वच गणेश मंडळे आणि व्यापारी वर्ग स्वयंसेवक म्हणून स्वेच्छेने काम करतात.

विवाह सोहळ्यात सहभागी प्रत्येक जोडप्याला संसारोपयोगी साहित्यासह मणी मंगळसूत्र, जोडवे, बिचवे, हळदी व लग्नाचा संपूर्ण पोषाख, बुट-चप्पलसह देण्यात येतो. सर्व नवरदेवांची घोडा व बॅन्ड, मेकअप करण्यासाठी स्वतंत्र टिम, सर्व वऱ्हाडी मंडळींना जेवण, मानाची शिदोरी,
प्रशस्त मंडप, स्पिकर, लाईट डेकोरेशन अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

.

