प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रवाशांचे हाल
करमाळा, प्रतिनिधी – दहा नवीन बसेसची भर पडूनही करमाळा आगारातील बसेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैना ठरलेलीच आहे. मध्यंतरीच्या काही काळ काहीसा सुखाचा गेल्यानंतर बसेस बंद पडण्याचा दिनक्रम पुन्हा सुरू झाला असून वेगवेगळ्या मार्गावरील वेगवेगळ्या बस बंद पडून प्रवाशांचे हाल पुन्हा सुरू झाले आहेत.

मंगळवारी दुपारी चार वाजता करमाळा आगारातून करमाळा ते स्वारगेट निघालेली बस तालुक्याच्या सीमेवर म्हणजेच कोर्टी येथे बंद पडली. ही बस पुढे जाणे शक्य नसल्याने सदर बसच्या वाहकाने मागून येणाऱ्या साडेपाचच्या करमाळा-स्वारगेट बस मध्ये बसवून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे प्रवाशांना मागून येणाऱ्या बसची वाट पाहत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. दरम्यान सायंकाळी साडेसहाच्या सुमारास करमाळा कडून येणारी साडेपाचची बस दिसल्यामुळे प्रवाशांनी आपाआपले सामान घेऊन बस मध्ये चढण्याची तयारी चालवली खरी मात्र या बसमध्येही गर्दीच दिसून येत होती.

गर्दी असली तरी कसे का होईना, पुढील प्रवास या बसमधून होईल या आशेने पहिल्या बस मधील प्रवासी ही बस जवळ येऊन थांबण्याची वाट पाहत असतानाच साडेपाचच्या बसनेही काही मीटर अंतरावरच मान टाकली आणि प्रवाशांचा पुन्हा हिरेमोड झाला.

आता या दोन्हीही बसच्या वाहकांनी प्रवाशांना सातच्या मुंबईत बसून देण्याचे आश्वासन दिले असले तरी सात वाजता सुटणारी करमाळा-मुंबई ही बस फुल रिझर्वेशन असल्याचे करमाळा आगारातून सांगण्यात आले आहे.

याबाबत करमाळा आगारातून माहिती घेतली असता सात वाजताच्या दरम्यान करमाळ्यातील दुसरी गाडी पाठवणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच याबाबत नव्यानेच पदभार स्वीकारलेले आगार व्यवस्थापक शिवाजी कानडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सहा वाजताच दुसरी गाडी पाठवली असल्याचे सांगितले. मात्र करमाळा आगारातून कोणतीही ज्यादा बस पाठवण्यात आली नाही. दरम्यान कोर्टीत बंद पडलेल्या दोन बसेस पैकी एक बस जागेवरच दुरुस्त करून दोन्ही बसेस मधील प्रवासी त्या बसमध्ये बसवून पुढे मार्गस्थ करण्यात आली.

पण या बसमधील प्रवाशांचे दुर्दैव इथेच संपलेले नाही. दुरुस्त केलेली बस कशीबशी राशीन येथे पुन्हा बंद पडली असून सात वाजता सुटणाऱ्या करमाळा-मुंबई या फुल रिझर्वेशन असलेल्या बस मध्ये हे सर्व प्रवासी बसवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकाराबाबत आगार व्यवस्थापकासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांशी प्रवाशांसह तेज वार्ता प्रतिनिधीने केलेल्या संभाषणादरम्यान सर्वांकडूनच उडवा उडवीची व उर्मट उत्तरे देण्यात आलेली आहेत.

