June 21, 2026
IMG-20260513-WA0006

मनोहर भोसले सहसाथीदारांवर आणखी एका गुन्ह्याची भर; पत्नीवरही वीजचोरीचा गुन्हा

करमाळा, प्रतिनिधी – मुतखडा असलेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी रक्कम घेऊन तसेच बाहेरवसा केला असल्याचे सांगून त्याच्याकडून हजारोंची रक्कम उकळल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदू बाबा मनोहर मामा भोसले सह त्याच्या साथीदारांवर करमाळा पोलिसात नवीन गुन्ह्याची भर पडली आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत फिर्यादीने म्हटले आहे की, फिर्यादीला मुतखड्याचा आजार होता. हा आजार बरा करतो म्हणून प्रथमतः त्याच्याकडून मनोहर मामा सह त्याच्या साथीदारांनी रु.११,००० रुपये घेतले. मात्र फरक पडला नसल्याने फिर्यादीने याबाबत मनोहर मामा सह त्याच्या साथीदारांकडे याबाबत विचारणा केली असता फिर्यादीवर कोणीतरी बाहेर वसा केला असल्याचे सांगून मंत्रोच्चारित पावडर देण्यासाठी फिर्यादीकडे आणखी 30000 रुपयांची मागणी आरोपींनी केली. मात्र एकूण ४१,००० रुपये देऊनही फिर्यादीला कोणताच फरक पडला नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत नमूद केले आहे

सदरच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मनोहर भोसले (रा.घोटी, ता.करमाळा), विशाल उर्फ नाथबाबा शहाजी वाघमारे (रा. मांजरी बुद्रुक), नरेंद्र बाळासाहेब सांगळे (रा. वेळू, ता. श्रीगोंदा), शिवाजी शहाजी वाघमारे आणि आप्पा शिवाजी जाधव (पत्ता माहीत नाही) या पाच जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 2013 च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून स.पो.नि. मनोज अभंग हे या गुन्हयाचा पुढील तपास करत आहेत.

मनोहर मामा मागचे शुक्लकाष्ठ संपता संपेना

कुर्डूवाडी येथील दाखल गुन्ह्यानंतर धनकवडी येथील व्यापाऱ्याने करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात मनोहर भोसले आणि त्याचे दोन साथीदार वाघमारे आणि सांगळे यांना सुनावण्यात आलेली पोलीस कोठडी मंगळवारी संपली होती. मंगळवारी या सर्वांना करमाळा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर दिनांक सात मे रोजी इंदापूर येथील म्हैत्रे यांनी मनोहर मामा सह साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात आरोपींना ताब्यात घेण्यापूर्वीच मंगळवारी पुन्हा मनोहरमामा आणि त्याच्या चार साथीदारांवर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासासाठी आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे.

लाखोंची वीजचोरी; पत्नीवर गुन्हा दाखल

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी करमाळा तालुक्यात धाडी टाकून वीज चोरी पकडली आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आली आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदू बाबा मनोहर भोसले यांच्या पत्नीचाही समावेश आहे. या वीज चोरीच्या घटनांबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता कल्पेश बापूराव साळुंके यांनी फिर्याद दिली आहे. दि. २८ एप्रिल २०२६ रोजी ते घोटी या गावी आकडे टाकून वीजचोरी तपासणीसाठी गेले होते. यावेळी रूपाली मनोहर भोसले यांनी महावितरणच्या लघुदाब वाहिनीवरून आकडा टाकून वीजचोरी करीत असल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!