सोलापूर – राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाच्या वाहतूक अधिकारी पदी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले संजय तारामती हरिभाऊ भोसले यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

भोसले यांनी यापूर्वी कोल्हापूर विभागातील मलकापूर आगार तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आगार आणि बार्शी आगार येथे आगार व्यवस्थापक म्हणून यशस्वीपणे कर्तव्य पार पाडले आहे. आगार व्यवस्थापक म्हणून काम करताना त्यांनी प्रवासीभिमुख प्रशासनावर भर दिला.

ग्रामीण भागाशी एसटीची नाळ अधिक घट्ट करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन ‘गाव तिथे एसटी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवला. अनेक दुर्गम वाड्या-वस्त्यांपर्यंत एसटी सेवा पोहोचवून त्यांनी प्रवाशांची अखंड सेवा केली आहे. त्यांच्या या कार्यशैलीमुळे ग्रामीण जनतेमध्ये ते लोकप्रिय ठरले आहेत.

वाहतूक अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भोसले म्हणाले, “प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानाची सेवा देणे हे माझे प्राधान्य राहील. ग्रामीण व शहरी भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

त्यांच्या या निवडीमुळे सोलापूर विभागाच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

.

.

.

