June 21, 2026
IMG-20260615-WA0034(1)

जुन्या एकत्र कुटुंब पद्धतीत त्याचा जन्म झाला. सहा मुली आणि पाच मुले अशा अकरा भावंडात हा बरोबर मधला. मात्र पाच मोठ्या आणि पाच लहान भावंडावर त्याने आतापर्यंत दडपशाही गाजवली. सुरुवातीपासूनच अप्पलपोट्या, स्वार्थी असल्याने पैशाचे त्याला सुरुवातीपासूनच आकर्षण होते. घरात खाण्यापिण्याच्या वस्तूंना काही कमी नसताना इतरांचे हक्काचे ओरबाडून घेण्यात त्याला आसुरी आनंद होत असे. कुमार वयात शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहून त्याला मौज मजा करायची चांगली सवय लागली होती. बाकीच्यांनी गावाकडे राबराब राबायचे आणि याने मात्र रुबाबात ऐश करायची.

नोकऱ्यांचा सुकाळ असताना सुदैवाने यालाही नोकरी लागली. नोकरी असल्याने चांगले स्थळही चालून आले. मात्र याचा हावरेपणा पाहून पहिल्या दोन स्थळांनी पोरगी घरी ठेऊन हळदीलाच याला हाकलून लावले. मग म्हातारीने पदर पसरून गावातच कसंतरी जमवलं.

लग्न झाल्यावर नोकरीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित असताना घरचा वडीलोपार्जित हिस्सा शाबूत ठेवण्यासाठी तो नोकरी सोडून परत घरच्या पारंपरिक व्यवसायात लुडबुड करू लागला. पण म्हातारा नोकरी कर म्हणाला. बाहेरच्याचं ऐकून हिस्सा मागणारा बापाचं कसं ऐकणार? मग याने चांगल्या भरल्या कुटुंबात वेगळं राहण्याची मुहूर्तमेढ रोवत बायकोला सास-याकडे व्यवसायासाठी जागा मागण्यासाठी पाठवले.

पण नोकरी आहे म्हणून छोकरी दिलेल्या सासऱ्याने त्याच्याच पुढ्यात व्यवसायासाठी जागा मागत असल्याने त्याला स्पष्ट नकार दिला. बाहेरच्यांनी केलेला अपमान गप्प गुमान गिळण्याची सवय असली तरी बाप आणि सासर्‍याने केलेला अपमान या भाड्याच्या जिव्हारी लागला आणि दोघांनाही बघून घेण्याचा चंग बांधत गल्लीतच दुसरी जागा भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू केला.

धरसोड वृत्ती असल्याने आयुष्यभरात त्याने एकूण अकरा वेगवेगळे व्यवसाय केले. याच्यापदरी व्यवसायाचे यश नसले तरी स्वार्थी आणि लोभी वृत्तीमुळे कशीतरी उपजीविका भागवत असतानाच दोन्ही मुले हाताखाली आली. त्यांना शाळा शिकवून त्यांचे भविष्य घडवण्यापेक्षा त्यांना कामाला जुंपून आज दोन गड्यांचा पगार वाचत असल्याचा जुजबी हिशोब लावत त्याने त्यांच्या भविष्याची माती केली. व्यवसायातून मिळत असलेल्या उत्पन्नातून घरात काय आहे काय नाही हे बघण्यापेक्षा बाप आणि सासर्‍याला दाखवण्यासाठी सोने खरेदी करण्यातच त्याने जास्त इंटरेस्ट दाखवला. मात्र घरात बक्कळ सोने असताना मुलींची लग्ने जमवताना तोळ्या-अर्ध्या तोळ्यासाठी बैठका मोडल्या.

स्थळे चांगली असल्याने मुलांनी वरील सोने देण्याचे परस्पर कबूल करून बहिणींसाठी आलेली स्थळे पदरात पाडून घेतली. नशिबाने त्यांना घरे चांगली मिळाल्याने मुलांची लग्ने करण्यापेक्षा मुलींच्या संसारातच तो ढवळाढवळ करू लागला. आपल्यात ठासून भरलेल्या कूटनीतीचा वापर करून त्याने तिकडूनही उत्पन्नाचा पाझर सुरू केला.

इकडे मुलांच्या लग्नाची जबाबदारी त्याने झटकून टाकली असली तरी मुलांनी कशीबशी स्वतःची लग्ने आटोपली. या लग्नांतही आपल्या हटखोर स्वभावाचा पुरेपूर उपद्रव मुलांना दिला. लग्ने होताच वडिलोपार्जित घरात मुलांनी संसार थाटू नयेत यासाठी सुनांशी भांडणे करून त्यांना वेगळे राहण्यास भाग पाडले. वेगळे राहत असतानाही त्यांना त्रास देण्यात त्याने कोणतीही कसर ठेवली नाही. एव्हाना मुलींकडून येणाऱ्या त्यांच्या संसारातील अर्थ रुपी पाझराचे आता चांगल्याच मोठ्या झऱ्यात रूपांतर झाले असल्याने त्याला तुटपुंजे उत्पन्न कमावणारी मुले नकोशी वाटू लागली होती.

स्वतःच्या आई-बापाने अन्नावाचून जीव सोडला असताना मुलांकडूनही पुरेसा लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्याने कायद्याचा आधार घेत त्यांच्यावर कोर्टात खटले दाखल केले. ऐन कमावण्याच्या दिवसांत कोर्टकचेरीच्या वाऱ्या कराव्या लागत असल्याने मुलांचे संसार मोडकळीस आले असतानाच भाड्याने असलेल्या जागेसह सासर्‍याच्या मिळकतीवरही या भाड्याने मालकी हक्क प्रस्थापित केला.

सासर्‍याची जमीन विकून आलेल्या पैशाने घरमालकाच्या बळकावलेल्या जागेवर बांधलेला बंगला कौतुकाने पाहत छद्मीपणे हसणाऱ्याला त्याच्या स्वार्थी, लोभी, ढोंगी वृत्तीने भावंडे, आईवडील, पाहुणे मंडळी, घरमालक , सासुरवाडी, पोटची मुले, नातवंडे आदींना कायम त्रास देत त्याची हावरट वृत्ती अशीच वाढत राहो, हीच त्याच्या विशिष्ट दिनानिमित्त सदीच्छा…!!!

ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कोणाच्या खाजगी जीवनाशी संबंधित असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-विशाल परदेशी,
संपादक, तेजवार्ता ऑनलाईन,
करमाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!