करमाळकरांच्या पाहूणचाराने भारावले ह.भ.प.संदीप बुवा मांडके
करमाळा, प्रतिनिधी – शहरातील राशीन पेठ येथे रविवार दि.७ जून ते शनिवार दि.१३ जून २०२६ या कालावधीत भव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यात प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीप बुवा मांडके (पुणे) यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत महापुराणाचे वाचन करत भाविकांना मंत्रमुग्ध केले.
राशीन पेठ येथील सोहम महिला मंडळाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कथा व्यास ह.भ.प. संदीप बुवा मांडके यांची सजवलेल्या रथातून सपत्नीक मिरवणूक काढून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सप्ताहा दरम्यान दररोज दुपारी ३.०० ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कथा व्यास ह.भ.प. संदीप बुवा मांडके यांनी हॉटेल रामभरोसे समोरील उमेश आगरवाल यांच्या हॉलमध्ये श्रीमद् भागवत महापुराणातील विविध प्रसंग, भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि जीवनमूल्यांचा उलगडा संगीतमय पद्धतीने केला. या संगीतमय कथासोहळ्या दरम्यान सुप्रसिद्ध तबलावादक विनायक गुरव यांनी तबल्यावर तर सुप्रसिद्ध गायक कृष्णदेव व्यवहारे यांनी गायनासह सिंथेसायझर वर बुवांना साथ दिली.
या सप्ताहास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घेतला. दररोजच्या कथा प्रसंगानुसार सादर करण्यात आलेल्या समर्पक जिवंत देखाव्यांनी उपस्थित भाविकांची मने जिंकली. रविवारी या कथा सोहळ्याचा सांगता समारंभा दरम्यान ह.भ.प. संदीप बुवा मांडके यांनी सोहम महिला मंडळ तसेच राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या पाहूणचाराने कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त केली. रविवारी दुपारी महाप्रसादाने या सोहळ्याचा समारोप करण्यात आला.
हा सोहळा पार पाडण्यासाठी सोहम महिला मंडळाच्या सर्व सदस्यांसह राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तालुक्यातील देवळाली येथील ‘हर हर महादेव साऊंड सर्व्हिस’चे आप्पा गोसावी यांनी या सोहळ्यासाठी उत्कृष्ट साऊंड सिस्टिमचे नियोजन ठेवले.